स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. २१) राष्ट्रवादीच्या माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर आज (दि. २२) त्यांनी जालन्यातील परतूर नगर परिषदेसाठी असलेल्या प्रचार सभेलाही हजेरी लावली. मात्र, उमेदवारांना खुर्ची न दिल्याने अजित पवार चांगलेच संतापल्याचे दिसून आले. त्यांनी कार्यकर्त्यांसह पोलिसांनाही फटकारले.
जालन्यातील प्रचार सभेत कार्यकर्ते आणि इतर नेतेमंडळी व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, नगरसेवक पदाच्या उमेदवारांना व्यासपीठासमोर बसण्यासाठी खुर्च्याच नाहीयेत, म्हणून ते भडकले. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक उठले आणि माईक हातात घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं. ते म्हणाले की, "मला पोलिसांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे. माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या येथे समोर व्यासपीठावर लावा. कार्यकर्त्यांनो, उठा आणि समोर लावा त्या खुर्च्या. मी सांगतोय त्यांना इथं बसवा. अरे काढा त्या खुर्च्या.. सांगितलेलं कळतं नाही काय?" सभेच्या ठिकाणी उमेदवारांना डी-झोन अर्थात विशेष राखीव क्षेत्रात बसण्याची परवानगी मिळाली नसल्याने अजित पवारांनी पोलिसांचीही कानउघाडणी केली.
मला मतदान करा, मी तुमचं काम करतो!
अजित पवार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानावरून चर्चेत येत असतात. बारामतीतील माळेगावच्या पहिल्याच प्रचार सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला. "मी साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुमचं काम करतो. तुम्ही मला काट मारली तर मी तुम्हाला काट मारणार", असे म्हणत पवारांनी कार्यकर्ते आणि उमेदवारांना थेट इशारा दिला. त्यात आज जालन्याच्या प्रचार सभेआधी त्यांचा राग अनावर झाला. अजित पवार यांच्या दोन्ही सभा सध्या चर्चेत असून त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे आणि कृतीमुळे निवडणुकीत त्याचा काय परिणाम होतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.