अजित पवार गटात दिवाळीनंतर धमाका? ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात, शरद पवार गटही भाजपसोबत जाण्याची शक्यता 
महाराष्ट्र

अजित पवार गटात दिवाळीनंतर धमाका? ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात, शरद पवार गटही भाजपसोबत जाण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने दुखावलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने दुखावलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत. या नेत्यांनी भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे बंड आकार घेऊ लागले आहे. येत्या काही दिवसांत हे नेते सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला करून पक्षावर दावा सांगण्याच्या तयारीत आहेत.    त्याचवेळी अजित पवार आणि शरद पवार गटाचे विलीनीकरण होऊन एकसंध पक्ष सत्तेत सहभागी होईल.    दिवाळीनंतर या प्रक्रियेला वेग येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णायकी अवस्थेत आहे. पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष चालवले आहे. पक्षनेतृत्वाकडून दिल्या जाणाऱ्या अवमानकारक वागणुकीला कंटाळून पक्षातील एक मोठा गट उठावाच्या तयारीत आहे, असे सूत्रांकडून समजते. कार्यशैलीबद्दल तक्रारीचा सूर

राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अभूतपूर्व 'यादवी'ची कल्पना राष्ट्रवादीच्या असंतुष्ट नेत्यांनी अमित शहा यांना दिली होती. त्यामुळे शहा यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांना स्वतंत्रपणे दिल्लीत बोलावून घेतले होते. या बैठकीत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यशैलीबद्दल पक्षाच्या नेत्यांनी तक्रारीचा सूर लावला. त्यावेळी शहा यांनी, तुम्ही सर्वजण मिळून त्या दोघांना बाजूला का सारत नाही, असा प्रश्न केल्याचे समजते.

विलीनीकरणाच्या दिशेने

राष्ट्रवादी अजित पवार गटातील बंड यशस्वी झाल्यानंतर फुटलेला गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. हा एकसंध गट केंद्र आणि राज्यातील सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

भाजप-श.प. गटाची जवळीक

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या आंदोलनात सक्रिय असल्या तरीही भाजप आणि शरद पवार गटात जवळीक वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यावेळी मोदी यांनी पवार यांना,  ‘तुम्ही विश्रांती घ्या. सुप्रिया आता तयार आहेत. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळतो. तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा’, असे सांगितल्याची माहिती पवार यांचे निकटवर्ती विठ्ठलशेठ मणियार यांनी दिली होती. या संदर्भाकडे लक्ष वेधत शरद पवार गट कोणत्याही क्षणी एनडीएच्या तंबूत दाखल होऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला.

ब्रीचकॅण्डी रुग्णालयात भेटीगाठींचे सत्रशरद पवार सध्या मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. शिवाय पटेल यांनी अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती पवार यांना दिल्याचे कळते.... तर शरद पवार गट स्वतंत्रपणे भाजपसोबतदोन्ही गटाच्या विलीनीकरणात काही कायदेशीर अडचणी आल्यास शरद पवार गट स्वतंत्रपणे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना केंद्रात आणि अन्य नेत्यांना राज्यात मंत्रिपदे दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातील दोन मंत्रिपदे शरद पवार गटाला मिळणार असल्याचे समजते.

शरद पवारांशी कधीच कटुता नव्हती : पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी, आमच्यात राजकीय मतभेद असले, तरी कौटुंबिक आणि सौहार्दपूर्ण संबंध कायम आहेत. आमच्यात कधीही कटुता निर्माण झाली नव्हती, असे स्पष्ट केले.

अजितदादा असते तर विलीनीकरण झाले असते - तटकरे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही, मात्र अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असते, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी केला. विशेष म्हणजे १२ फेब्रुवारी ही विलीनीकरणाची तारीखही निश्चित झाली असती. परंतु अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे हा विषय मागे पडल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

आता विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही - अनिल देशमुख

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांची भूमिका वेगळी होती. त्यावेळी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी नागपूर येथे केला. आता विलीनीकरणाचा प्रश्नच नाही, आमच्या पक्षात येणार असाल तर स्वागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत - रोहित पवार

विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा दावा तटकरे आणि पटेल यांनी अजितदादांच्या निधनानंतर केला होता. आता अचानक चर्चा झाली होती, हे मान्य करण्याचे कारण काय? दादांच्या निधनानंतर वस्तुस्थिती का लपवण्यात आली होती, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवार भाजपच्या धोरणांविरोधात सातत्याने लढत असल्याने ते त्या पक्षासोबत जाणार नाहीत , असेही ते म्हणाले.

बंडामागे महाशक्ती?

पक्षाच्या घटनेत पक्षाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविण्याची तरतूद आहे की नाही, अशी विचारणा शहा यांनी केल्याचे समजते. त्यावर सुनेत्रा पवार यांच्या २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या निवडीला आव्हान देत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती देण्यात आली. यावर शहा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुमच्या स्तरावर निर्णय घेण्याची सूचना केल्याचे समजते. शहा यांचा या बंडाला पाठिंबा असल्याने अजित पवार गटात दिवाळीनंतर मोठा धमाका होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला.

विलीनीकरणाची शक्यता नाही - जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची ही शक्यता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी तूर्त फेटाळून लावली. आम्ही यापूर्वी दोन्ही पक्ष एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्याला समोरून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ चर्चा करून काही साध्य होत नाही. पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित नेतृत्वावर आहे. असा निर्णय घ्यायचा असल्यास संबंधितांनी पक्षात येऊन तो घ्यावा, अशी भूमिका शरद पवारांनी यापूर्वीच मांडल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी; महाराष्ट्रासह ७ राज्यांबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय

महर्षी फाऊंडेशनला जमीन देण्याचा निर्णय रद्द; उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका, टाटा कंपनीसोबतचा वीजनिर्मिती करार वाऱ्यावर

उद्योगपती बियाणींविरुद्ध गुन्हा दाखल; CBI चे ९०४.३२ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी छापे

बेसुमार जंगलतोड, तरीही वनक्षेत्रात मात्र वाढ?

आजचे राशिभविष्य, ७ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत