अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले; पिंकी माळीच्या वडिलांचाही घातपाताचा आरोप 
महाराष्ट्र

अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले; पिंकी माळीच्या वडिलांचाही घातपाताचा आरोप

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत ठार झालेल्या 'फ्लाईट अटेंडन्ट' पिंकी माळी यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी बारामती येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे.

Swapnil S

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत ठार झालेल्या 'फ्लाईट अटेंडन्ट' पिंकी माळी यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी बारामती येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे. अजित पवारांच्या मृत्यूविषयी ना-ना प्रकारचे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना पिंकी माळीच्या वडिलांनीही हा आरोप केल्यामुळे या अपघाताबाबत संशय वाढला आहे.

पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करताना एका वृत्तवाहिनीशी सांगितले की, अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिकच नव्हे, तर विमानही बदलण्यात आले होते. यापूर्वी पिंकी माळीने ४ वेळा अजित पवारांसोबत काळ्या व करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र त्यांना पांढऱ्या रंगाचे विमान देण्यात आले. असे का?

सकाळी सहा वाजता मुंबईत ट्रॅफिक कुठे असते?

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे विमानाचा पायलट पोहोचू शकला नाही, हा दावाही शिवकुमार माळी यांनी खोडून काढला आहे. मुंबईत सकाळी ६ वाजता कोणत्या भागात ट्रॅफिक असते? असा खडा सवाल त्यांनी याप्रकरणी उपस्थित केला आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्याकडील पुरावे सर्वांपुढे मांडले. त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय वाटतो, असे ते म्हणाले. शिवकुमार माळी यांच्या या आरोपामुळे अजित पवारांचे विमान खरेच ऐनवेळी बदलण्यात आले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विमान कंपनीने आमच्याशी संपर्क साधला नाही!

पिंकीने आदल्या दिवशी मला फोन करून आपण अजित पवारांसोबत प्रवास करणार असल्याचे सांगितले होते. बारामतीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी बोलेन असे ती म्हणाली होती. तुला काही बोलायचे आहे का? असे विचारले असता तिने आपल्याला खूप काही बोलायचे आहे, असे सांगितले. पण दुर्दैवाने लँडिंगवेळी अपघात झाला. दुर्दैव म्हणजे, पिंकीच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमान कंपनीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. तिचे वेतन, भत्ते व विम्याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आले नाही, असेही शिवकुमार माळी यावेळी म्हणाले.

रोहित पवारांनी पायलटवर व्यक्त केला संशय

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाच्या एका क्लिपचा दाखला दिला आहे. या क्लिपमध्ये त्या ‘ओह शीट, ओह शीट’ असे म्हणताना ऐकू येत आहेत. आपले विमान कोसळणार असल्याचा अंदाज आल्यानंतरच त्या असे बोलल्या असतील, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांचे विमान ज्या गावात कोसळले तेथून नेहमी विमाने जातात. तेथील लोकांना विमानांचा आवाज परिचित आहे. गावातील लोकांच्या मते, अजित पवारांच्या विमानातून एक वेगळाच आवाज येत होता. त्यांचे विमानही खूप खाली होते. या सर्व परिस्थितीचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असावा. कदाचित कुणीतरी विमानातील सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून विमान खाली आणले असावे. विमान खूप खाली आल्यानंतर ‘स्टॉल वॉर्निंग सिस्टीम’ सुरू होते. पण कदाचित अजित पवारांच्या विमानातील ही इशारा यंत्रणा बंद असावी. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा मुख्य आक्षेप पायलट सुमीत कपूर यांच्यावर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य निश्चित बाहेर येईल - फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार आपल्या सर्वांचे लाडके नेते होते. त्यांच्या निधनाचे सत्य बाहेर यावे असे प्रत्येकाला वाटत आहे. याप्रकरणी योग्य तो तपास सुरू असून, सर्वांनी भारतीय तपास यंत्रणांवर विश्वास दाखवला पाहिजे. रोहित पवारांनीही त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण