महापालिका निवडणुकीनंतर राज्यात मोठा भूकंप? पिंपरी-चिंचवडच्या सभेत अजित पवारांचे भाकित; दोन्ही NCP एकत्र येण्याचेही दिले संकेत Photo : X (Ajit Pawar)
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीनंतर राज्यात मोठा भूकंप? पिंपरी-चिंचवडच्या सभेत अजित पवारांचे भाकित; दोन्ही NCP एकत्र येण्याचेही दिले संकेत

अजित पवार यांनी सभेत चौफेर फटकेबाजी करत महापालिका निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. त्याचप्रमाणे फक्त महापालिका निवडणुकाच नव्हे तर नंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी उघडपणे दिले.

Swapnil S

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बुधवारी एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उत आला आहे. अजित पवार यांनी सभेत चौफेर फटकेबाजी करत महापालिका निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. त्याचप्रमाणे फक्त महापालिका निवडणुकाच नव्हे तर नंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी उघडपणे दिले.

भ्रष्टाचारी ‘आकाला’ संपविण्याचा दिला इशारा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना अजित पवारांनी थेट आव्हानच दिले. ‘भ्रष्टाचार करणाऱ्या आकाला संपवायचे आहे,’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केले. ‘त्या आकाला आपल्याला जागा दाखवायची आहे. अनेक जण सरड्यासारखे रंग बदलतील, भावनिक आवाहन करतील, ही माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून पाय धरतील. पण तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय त्यांची शेवटची निवडणूक होणार नाही,’ असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

शरद पवारांचे योगदान केले मान्य...

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असून, याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रचारसभेत सूचक वक्तव्य केले. ‘तुतारी आणि घड्याळ दोघेही सोबत लढतोय. आम्हाला वाद घालायचा नाही. मागे जे काही झाले ते गंगेला मिळाले’, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना एकोप्याने काम करण्याचे आवाहन केले. तसेच ‘काकांच्या पुण्याईने माझं लई बरं चाललंय,’ असे सांगत त्यांनी थेट शपथच घेतली. शरद पवारांचे योगदानही मान्य करून हिंजवडीतील आयटी पार्क हे शरद पवारांनी आणल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

विरोधकांसह नाराजांनाही तंबी

अजित पवारांनी या प्रचारसभेत आपल्या राजकीय विरोधकांना थेट इशाराच दिला. ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. मी कुणाच्या नादी लागत नाही, पण कोणी माझ्या नादी लागलं तर मी सोडत नाही,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांसह नाराज नेत्यांनाही तंबी दिली. दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अजित पवारांनी जोरदार हल्ला केला. ‘मी ज्यांना ताकद दिली, तेच मला सोडून गेले. त्यांच्या मुलांवर काय आरोप होते, हे ते विसरले. दादागिरी, दहशत, गुंडगिरी सुरू होती,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात