अकोला देशात सर्वात उष्ण; जुन्नरमध्ये उष्माघाताचा बळी, पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा  
महाराष्ट्र

अकोला देशात सर्वात उष्ण; जुन्नरमध्ये उष्माघाताचा बळी, पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

ईशान्य भारताचा अपवाद वगळता, भारतातील बहुतेक राज्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले आहे.

Swapnil S

मुंबई : ईशान्य भारताचा अपवाद वगळता, भारतातील बहुतेक राज्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान ४६ अंशांच्या वर गेले आहे. महाराष्ट्रातील अकोला येथे सर्वाधिक ४६.९°सें. तापमान नोंदवले गेले. त्यानंतर अमरावती (महाराष्ट्र) मध्ये ४६.८°सें., बांदा (यूपी) मध्ये ४६.६°सें., वर्धा (महाराष्ट्र) येथे ४६.४°सें., जैसलमेर (राजस्थान) आणि यवतमाळ (महाराष्ट्र) मध्ये ४६°सें. तापमान होते.

दरम्यान, जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथे उष्माघाताने शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात सकाळी ११च्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असताना खुरपणीचे काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास झाल्याने रुपाली भाऊ गाडगे (वय ४०) या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे निमगाव सावा गावासह संपूर्ण परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे विशेषतः शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत कष्टाची कामे टाळावीत. कामाच्या ठिकाणी सोबत पाणी, लिंबू सरबत किंवा ताक ठेवावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पुढील २ दिवस महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, ओडिशा आणि तमिळनाडूमध्ये खूप उष्ण आणि दमट हवामान असण्याची शक्यता आहे.

‘पक्षपाती’ न्यायमूर्तींविरुद्ध बंड; खटल्यात हजर न राहण्याचा अरविंद केजरीवालांचा निर्णय

भोंदूबाबा खरातबाबत धक्कादायक खुलासे; मुलींसोबत दारू प्यायचा, खंडण्यांतून कमावले कोट्यवधी

Mumbai : सोमवार ठरला घातवार; मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातात तिघांचा बळी

हा लोकशाहीच्या मुळावरच घाव

आजचे राशिभविष्य, २८ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत