महाराष्ट्र

जळगावातील राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या चिंतन सभेत निर्णय मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लोकसभेच्या जिल्ह्यातील रावेर-जळगाव या दोन्ही जागा जिंकण्याची संधी असताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी काम न केल्याने अपयश आल्याचा ठपका

Swapnil S

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लोकसभेच्या जिल्ह्यातील रावेर-जळगाव या दोन्ही जागा जिंकण्याची संधी असताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी काम न केल्याने अपयश आल्याचा ठपका ठेवत जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व फ्रंटच्या कार्यकारिणी, तालुका मनपा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या. त्याचबरोबर नव्या कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या झालेल्या जिल्हा चिंतन सभेत करण्यात आला. अचानक कार्यकारिणी बरखास्त केल्याने वर्षानुवर्षे पदावर राहिलेल्यांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील होते.

२०१४ पूर्वी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. पाच आमदार या पक्षाचे होते. नंतर पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आणि पक्षाची वाताहत झाली. २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत यामुळे पक्ष आपला प्रभाव दाखवू शकला नाही. आज शरद पवारांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असताना केवळ पदाधिकारी क्रियाशील नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे संघटन जिल्ह्यात ठामपणे उभे राहिले नसल्याचे म्हटले जात आहे. नेत्यांमध्ये समन्वय नाही, काही नेत्यांना बैठकीला डावलले जाते. पदाधिकारी हे केवळ सभेपुरते येतात, स्टेजवर बसून चेहरा आणि नाव कसे उजेडात येईल यालाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. काहीजण फोटोसाठी आंदोलन करत असल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार दिला असतांना या पदाधिकाऱ्यांनी काम न केल्याने पराभव पत्करावा लागला. या सर्व गोष्टींचा कडेलोट नाराजीच्या सरूपात व्यक्त झाला.

अमळनेर आणि जामनेर येथील पदाधिकाऱ्यांनी पक्षातील कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. पक्षाचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सभेत उपस्थित पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या पण आपण जिल्ह्यात दोन जागा गमावल्या. या दोन जागा आपण का गमावल्या? याचे आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. पदाधिकारी म्हणून आपण पक्षहितासाठी नेमके काय काम करतो? ते तपासून पाहण्याचे निर्देश दिले. सभेव्यतिरिक्त कितीवेळा या कार्यालयात येतो, किती आंदोलनात सहभागी होतो हे तपासून पाहण्याची प्रत्येकाला गरज आहे. आपल्या उदासीनतेमुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यास आपण पदाधिकारीच जबाबदार आहात. त्यामुळे पदावर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. सर्व कार्यकारिणी बरखास्त करून तथे नव्या दमाचे पदाधिकारी नेमा आणि पक्षाला विधानसभेत चांगगले यश मिळवून द्या, असे आवाहन करताच सर्वांनी सहमती दशर्वली.

जिल्हाध्यक्षांसह विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करावी, असा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले. सात दिवसात नवीन जिल्हाध्यक्ष व कार्यकारीणी जाहीर करावी, असे आवाहन सतीश पाटील यांनी केले. या घटनेचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर,सतीश पाटील, अरूण गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे , वाय. एस. महाजन यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

नवा जिल्हाध्यक्ष ओबीसी गटाचा

नवा जिल्हाध्यक्ष नेमतांना तो ओबीसी असावा तर दोन कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये एक आदिवासी तर दुसरा मुस्लिम असावा अशा सूचना करण्यात आल्या या दोन्ही सूचना मान्य करण्यात आल्या. माजी मंत्री अरुण गुजराथी यांनी बोलतांना म्हणाले की, शरद पवार यांनी राज्यात सरकार आणण्याची ग्वाही दिली आहे. आपण त्यांना जिल्ह्यातून आमदार देण्याची ग्वाही देऊया असे सांगत आपण व आपला पक्ष कोणत्याही बाजूने झुकतोय असे वाटता कामा नये. सर्व समाजाला सोबत घेऊन आपण जात आहोत याची शाश्वती त्यांना वाटली पाहिजे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते