(Photo - @_Avykt/X)  
महाराष्ट्र

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नका, कर्नाटक सरकारला निर्देश द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राला पत्राद्वारे विनंती

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो.

Swapnil S

मुंबई : कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे पत्र पाठविले आहे.

या पत्रात अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधाऱ्यांचे बांधकाम यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसरातील नागरिकांच्या व्यथा-वेदनाच मांडल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम रुरकीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडे सोपविले आहे. या अभ्यासातून पूर परिस्थितीबाबतची माहिती समजून घेता येणार आहे. याबाबतच अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही, तोवर या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय विवेकी ठरणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

कर्नाटक शासनाचा अलमट्टी जलाशयाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४.२५६ मीटर करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात केला आहे. अशी उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत दरवर्षीच्या पूरस्थितीत आणि त्यामुळे नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखे होईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

अलमट्टी धरणाची जलाशय पातळी सहा मीटरने वाढविण्याचा कर्नाटक शासनाचा निर्णय आहे. यामुळे कृष्णा नदीतही या काळात सातत्याने सहा मीटर पाणी थांबणार आहे. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होईल. याचा विचार करता, अलमट्टी धरणाची उंची (पूर्ण जलाशय पातळी) वाढविण्याच्या निर्णयाचा कर्नाटक शासनाने पुनर्विचार करावा, याकरिता त्यांना निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात पूरस्थिती

अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम नद्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेवर झाला आहे. यामुळे पुराचे पाणी ओसरण्याची गती संथ झाली आहे. याशिवाय बंधाऱ्यामध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचू लागला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

...तर सरकारला कंपन्या बंद करण्याचे अधिकार; नवीन कामगार कायद्यानुसार कारवाई होणार, नागपूर स्फोटप्रकरणी कामगार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

Mumbai : लाडकी सफाई कर्मचारी बहीण योजना; दरवर्षी BMC करणार सन्मान, सभागृहाची मंजुरी