मुंबई : मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचविले आहे. त्यात कृषीमंत्री कोकाटे यांच्याही नावाचा समावेश आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचेही नाव असल्याचे माझी पक्की माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.
सरकारमधील कुणाचे व्हिडीओ पैशांच्या बॅगेबरोबर दिसत आहेत, तर कुणी आमदार निवासात मारहाण करत आहे. कुणी विधानभवनातच मारामाऱ्या करत आहे, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. तर कुणी सभागृहात मोबाइलवर गेम खेळत आहे. अमित शहा यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचविले आहे. त्यात कृषी मंत्री कोकाटे यांच्याही नावाचा समावेश आहे, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात अमानुष पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे. तीन महिन्यात महाराष्ट्रात ६५० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लातूरहून मुंबईला चालत आले. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आमच्या कृषीमंत्र्यांकडे वेळ नाही. कृषीमंत्र्यांच्या मागच्या काळातील विधाने पाहिली तर सरकारने कृषी क्षेत्राला काय योगदान दिले आहे, हे कळून येईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.