अजित पवार यांची कार्यपद्धती थक्क करणारी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार  X|PTI
महाराष्ट्र

अजित पवार यांची कार्यपद्धती थक्क करणारी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. त्यांची कार्यसंस्कृती भावी राजकीय नेत्यांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केल्या.

Swapnil S

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. त्यांची कार्यसंस्कृती भावी राजकीय नेत्यांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केल्या. कोविड साथीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नसे, पण अजित पवार यांची त्यावेळची कार्यपद्धती थक्क करणारी होती, अशी प्रशंसा त्यांनी केली.

पुणे जिल्हा परिषद परिसरातील अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि भव्य प्रवेशद्वाराचे नामकरण शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, पार्थ पवार, जय पवार आदी यावेळी उपस्थित होते.

शहा म्हणाले, अजितदादा हे केवळ एक राजकीय सहकारी नव्हते तर आपले खास मित्र आणि अत्यंत निकटचे साथी होते. ते अत्यंत सकारात्मक आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच प्रसन्न हास्य पाहिले. पंचायत राज, सहकार क्षेत्र, कृषी आणि आधुनिक नगर विकास या सर्व क्षेत्रांत त्यांच्याकडे एक स्पष्ट दूरदृष्टी आणि दीर्घ अनुभव होता. असा अष्टपैलू लोकनेता अचानक गमावणे ही संपूर्ण राज्यासाठी अतिशय दुःखाची बाब आहे.

राजकारणात अनेकदा संदिग्ध किंवा द्वयअर्थी भाषा वापरली जाते, परंतु अजित पवार हे अत्यंत स्पष्टवक्ते होते. राजकीय चर्चांमध्ये किंवा कितीही कठीण राजकीय वाटाघाटींमध्ये दादांचे उत्तर नेहमी हो किंवा नाही असे अत्यंत स्पष्ट असायचे. राजकारणात असे धाडस दाखवणारे प्रामाणिक नेते अतिशय दुर्मिळ असतात. बारामतीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतरही अजितदादांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले.

कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या काळात अजित पवार यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेचे अमित शहा यांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ऑक्सिजन व औषधांचा प्रचंड तुटवडा असताना, गृह मंत्रालय आपत्ती व्यवस्थापनाचे काम पाहत होते. त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ शकत नव्हता, मात्र उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सकाळी ७ वाजताच मंत्रालयातील सचिवालयात हजर राहून लँडलाइन फोनवरून कामाचा आढावा घेत असत. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सकाळी ७ वाजता कार्यालयात उपस्थित राहून ऑक्सिजन व औषधांची व्यवस्था करणे आणि दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कामांचा संपूर्ण अहवाल मेलद्वारे पाठवणे, ही दादांची कार्यपद्धती थक्क करणारी होती अशी प्रशंसा त्यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

निवडणूक आयोगाला ४८ प्रश्न; SIR प्रकरणी राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबईत मलेरियाचा उद्रेक; नऊ महिन्यांत साडेबारा हजार जणांना लागण; हिवतापमुक्त शहराचे आव्हान कायम

बिल्किस बानो प्रकरणातील दोघांची शिक्षा स्थगित; जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

आत्मकथनातील सोनियांचे 'असत्याचे प्रयोग'

आजचे राशिभविष्य, १७ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत