अमरावती लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर; सरकारकडून SIT स्थापन 
महाराष्ट्र

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर; सरकारकडून SIT स्थापन

परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारकडून ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली आहे.

Swapnil S

अमरावती : परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, अचलपूर नगरपरिषदेने आरोपी तन्वीरच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर बुधवारी बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली.

प्रेमाच्या बहाण्याने मुलींना ओढले जाळ्यात

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारकडून ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप करत संबंधित आरोपीने १८० तरुणींचे शोषण केल्याचा आणि सुमारे ३५० अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा दावा केला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला. आरोपींनी प्रेमाच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर येत असून, हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

आरोपींनी मोबाईलमधील डेटा केला डिलीट

तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती मिळत आहे. हे व्हिडिओ इतर साथीदारांना पाठवले गेले का, याचा शोध घेतला जात आहे. काही व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाल्याचेही समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलीट केला असला, तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आरोपीने सात पीडित तरुणींची नावे केली उघड

या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू ठेवला असून, महिला अधिकारी आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने सात पीडित तरुणींची नावे उघड केली आहेत. न्यायालयाने मुख्य आरोपीला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त

या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकरणात आता प्रशासनानेही कडक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याच्या घरावर कारवाई सुरू झाली आहे. अचलपूर नगरपरिषदेकडून संबंधित घरावरील अतिक्रमणाबाबत तपास केला असून, काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचे समोर आले होते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

राज्यात शनिवारपासून अवकाळीचा इशारा; अकोल्यात उष्माघाताचा बळी

...तर भाडेकरू बनतो सहमालक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...१ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव

नाशिक टीसीएस प्रकरण: सत्यशोधन समितीची स्थापना; राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून घेतली दखल

आजपासून संसदेचे विस्तारित अधिवेशन; घटनादुरुस्ती आणि सीमांकनासह महत्त्वाची विधेयके मांडणार