

समस्तीपूर : छठपूजेसाठी बनवलेला प्रसाद खाल्ल्याच्या रागातून आईनेच आपल्या चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात घडली आहे. या मारहाणीनंतर मुलीची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव सुहानी कुमारी (वय ४) असे असून ती राजू पासवान आणि रीना कुमारी यांची मुलगी होती. छठपूजेनिमित्त पासवान कुटुंबीय सणाच्या तयारीत व्यस्त होते. कुटुंबातील इतर सदस्य पूजेच्या तयारीसाठी जवळच्या घाटावर गेले होते. त्यावेळी रीना घरी पूजेसाठी प्रसाद तयार करत होती.
याचदरम्यान, सुहानीने प्रसादासाठी तयार केलेल्या पदार्थांपैकी एक पदार्थ खाल्ल्याचे सांगितले जाते. यामुळे संतापलेल्या रीनाने मुलीला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सुहानीची प्रकृती बिघडली. त्यानंतर रीनाने तिला उपचारासाठी खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
वडिलांकडून कठोर शिक्षेची मागणी
मुलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मुलीचे वडील राजू पासवान यांनी पत्नीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 'मुलगी आता या जगात नसल्याने छठपूजेच्या सणाचा आनंद उरलेला नाही', अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, उर्वरित मुलांचा सांभाळ आपण स्वतः करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजू पासवान आणि रीना कुमारी यांना सात वर्षांची शिवानी, चार वर्षांची सुहानी आणि दीड वर्षांचा राजा अशी तीन मुले होती. मात्र, सुहानीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
आईला अटक, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राकेश कुमार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी समस्तीपूर येथील रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आरोपी आई रीना कुमारीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून मुलीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.