पुणे/एफपीजे ब्युरो : राज्यात विधानसभा निवडणुका होण्यास अवघे दोन महिने उरलेले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या सनसनाटी आरोपाने राज्यातच नव्हे तर दिल्लीत खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या आरोपाचे पडसाद निवडणुकीच्या काळात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा भंडाफोड केला आहे. या कामात मध्यस्थ करणाऱ्या व्यक्तीची ओळख देशमुख यांनी उघड केली. त्यामुळे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही हेही त्यांच्याकडील ध्वनीफित जाहीर करतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माझ्याकडे तीन वर्षांपूर्वी मध्यस्थीसाठी आलेला व्यक्ती म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा आघाडीचा प्रमुख समीत कदम होय, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस व अनिल देशमुख यांनी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला आहे. हे पुरावे खरोखरच दोघांनी उघड केल्यास येत्या काही आठवड्यात राज्यात मोठा राजकीय धमाका होऊ शकतो.
अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी तीन वर्षांपूर्वी राज्याचा गृहमंत्री होतो. तेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने एका मध्यस्थाने माझी भेट घेतली. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफर होती. मला ऑफर देऊन उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना अडकवण्याचा डाव होता. आरोप करण्यासाठी ४ प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी मला सांगितले होते. मला भेटलेली व्यक्ती म्हणजे मिरजेतील समित कदम. आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितने आणला होता. समितने ५ ते ६ वेळा माझी भेट घेतली. माझ्याकडे भेटीचे व्हिडीओ आहेत”, असा दावा देशमुख यांनी केला आहे.
फडणवीस यांची ऑफर नाकारल्यानंतर केंद्रीय यंत्रणांची माझ्यावर कारवाई झाली. माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे असल्याचे देशमुख यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. तेच कदम माझ्याकडे आल्याचे व्हीडिओ पुरावे आहेत. गरज पडल्यास ते मी उघड करेन, असे देशमुख यांनी जाहीर केले.
याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वीच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हायकोर्टाच्या आदेशानुसार देशमुख यांच्यावर कारवाई झाली आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. माझ्याकडे देशमुख यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह ध्वनीचित्रफिती आहेत.
देशमुख व फडणवीस यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोपामुळे देशात सनसनाटी निर्माण झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना सहानुभूती मिळाली होती. ठाकरेंना टार्गेट केल्याबद्दल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर जनतेने विश्वास ठेवला तर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीची लाट निर्माण होईल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देशमुखांनीच भेटायला बोलावल्याचा समित कदमचा दावा
“अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तिथे मी त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नव्हतो. मुळात त्यांनीच मला तिथे बोलवले होते. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो”, असा दावा समित कदम याने केला आहे. ‘अनिल देशमुख ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत आहेत, ते चुकीचे आहे. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी अनिल देशमुखांकडे जा, असे मला कधीही सांगितलेले नाही’, असे समित कदमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.