मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह त्यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निर्णय दिला. राष्ट्रवादीच्या या फूटीत महत्त्वाची भूमिका निभावलेल्या अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेरण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जात आहे. यासाठी त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे यांना शरद पवार गटात प्रवेश दिला आहे.
खासदार सुनील तटकरे यांना शरद पवार यांनी मानाची पदे दिली, मंत्रीही केले. त्यांना खासदार करून दिल्लीला पाठवले. हे सगळे केल्यानंतरही अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत गेले. एवढेच नाही तर ते आता वारंवार शरद पवार गटावर आरोप करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींचा वचपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्याविरोधात खेळी खेळली आहे. सुनील तटकरे आणि त्यांचे मोठे बंधू अनिल तटकरे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. याच गोष्टीचा फायदा शरद पवार यांनी उचलत अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश दिला आहे.
अनिल तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे. अनिल तटकरे यांची पक्षाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल तटकरे यांच्या प्रवेशावेळी माजी मंत्री, आमदार राजेश टोपे, आमदार सुनील भुसारा, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व शेकापचे आमदार जयंत पाटील हेदेखील उपस्थित होते.