महाराष्ट्र

राज्यात ८१ हजार कोटींच्या ७ गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी; कोकणासह मराठवाडा, विदर्भात होणार २० हजार रोजगारनिर्मिती

उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिल व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणासह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिल व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणासह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय. एस. चहल, प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. यांचा लिथियम बॅटरी निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पासाठी २५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. त्यातून ५ हजारपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लि. कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, ५२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेक्ट्रिक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे, तर हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजमार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. १५०० कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पात प्रथम टप्प्यात रुपये १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. ४ हजारपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणार आहे.

आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल, जि. रायगड या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, याद्वारे ८००० पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये १७८५ कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी