नागपूर : मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाने २८ दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. फर्लो मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका अरुण गवळी याने केली होती. यापूर्वीही गवळीला फर्लो मंजूर करण्यात आला होता. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला नव्हता, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांनी मंगळवारी गवळी याला २८ दिवसांचा सशर्त फर्लो मंजूर केला. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी याला अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने गवळी याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.