मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालय बुधवार, २५ जूनला अंतिम निकाल जाहीर करणार आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यानंतर ७६ लाखांहून अधिक मतदान झाले, असा आरोप याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात केला. त्यांच्या युक्तिवादासह प्रतिवादी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारची बाजू ऐकून घेत न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण केली आणि निकाल राखून ठेवला. या निकालाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विक्रोळी येथील रहिवासी चेतन अहिरे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला. त्याची नोंद खंडपीठाने घेतली.
निवडणुकीत शेवटच्या क्षणी ७६ लाखांहून अधिक मतदान
मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी ७६ लाखांहून अधिक मतदान झाले. त्या मतदानाचा ठोस पुरावा नाही. २८८ मतदारसंघांपैकी १९ जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर ७६ जागांवर कमी मतदान नोंद झाले, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.