मुंबई : बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर शाळेच्या विश्वस्तांचा मानव तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाचा तपास तातडीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांच्या वतीने अॅड. कटारनवरे यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. याची दखल खंडपीठाने घेत आधी याचिका दाखल करा, असा सल्ला देत सुनावणी बुधवारी घेण्याची हमी दिली. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला.
सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारीही फरार
बदलापूरमध्ये गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, असा दावा करताना ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारीही अद्याप फरार असल्याने ठाणे पोलीस आणि एसआयटी कारभारावर सवाल प्रश्न केले आहेत. संपूर्ण तपास सीबीआयकडे वर्ग करा, अशी विनंती याचिकेत माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केली आहे.