बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक आणि विक्रमी विजय नोंदवत नवा राजकीय टप्पा गाठला आहे. बारामतीच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. मतमोजणीच्या २४व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बारामतीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला.
अजित पवारांचाही मोडला विक्रम
माहितीनुसार, यापूर्वी बारामतीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा विक्रम दिवंगत अजित पवार यांच्या नावावर होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा १,६५,२६५ मतांनी पराभव करत हा विक्रम केला होता. आता सुनेत्रा पवार यांनी त्याच विक्रमाला मागे टाकत बारामतीच्या राजकीय इतिहासात नवा बेंचमार्क निर्माण केला आहे.
सुरुवातीपासूनच एकतर्फी लढत
या पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले. एकूण २,२३,७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ही लढत एकतर्फी असल्याचे स्पष्ट झाले. २४ फेऱ्यांच्या मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवली. कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या मतमोजणीत विरोधकांना कोणतीही ठोस लढत देता आली नाही.
सहानुभूतीची लाट, पवार घराण्याचा प्रभाव
यावर्षी २८ जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि बारामतीत पवार घराण्याचा दीर्घकाळापासून असलेला प्रभाव, या दोन्ही घटकांचा मोठा फायदा सुनेत्रा पवार यांना झाला. मतदारांनी त्यांना स्पष्ट पसंती दिल्याचे निकालातून दिसून आले.
विरोधकांचा प्रभावच नाही
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यानंतर एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुतांश उमेदवार अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे होते. करुणा मुंडे, अभिजीत बिचुकले यांच्यासह इतर उमेदवार मैदानात असले, तरी कोणीही सुनेत्रा पवार यांना प्रभावी आव्हान देऊ शकले नाही. सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील उर्वरित २२ उमेदवारांना मिळून सुमारे ३,८३० मते मिळाल्याने ही लढत एकतर्फी असल्याचे स्पष्ट झाले.
बारामती राष्ट्रीय पातळीवर चर्चेत
सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी मताधिक्याने या निकालाची राष्ट्रीय पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. बारामतीतील पवार घराण्याचा प्रभाव अजूनही अबाधित असल्याचा ठळक संदेश या निकालातून आला आहे. या निकालाने केवळ जागा राखली नाही, तर पवार कुटुंबाचे बारामतीवरील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
अजित पवारांचे बारामतीवरील वर्चस्व
बारामती मतदारसंघावर अजित पवार यांचे अनेक दशकांपासून निर्विवाद वर्चस्व राहिले. त्यांनी अनेक निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आणि बारामतीत स्वतःचा मजबूत जनाधार निर्माण केला. २०१९ मधील १.६५ लाखांहून अधिक मताधिक्याचा विजय हा त्यांचा सर्वात मोठा विक्रम मानला जात होता. मात्र, या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी तो विक्रम मोडत आणखी मोठा जनादेश मिळवला.
अजित पवार यांना मिळालेले वर्षनिहाय मतदान आणि मताधिक्य
१९९१ : ९६,०३२ मते | मताधिक्य : ८६,९१५ | मतांचे प्रमाण : ९०.४३%
१९९५ : ९१,४९३ मते | मताधिक्य : ७७,३३५ | मतांचे प्रमाण : ७१.९१%
१९९९ : ८६,५०७ मते | मताधिक्य : ५०,३६६ | मतांचे प्रमाण : ६९.७२%
२००४ : ९६,३०२ मते | मताधिक्य : ६६,१५७ | मतांचे प्रमाण : ६९.०७%
२००९ : १,२८,५४४ मते | मताधिक्य : १,०२,७९७ | मतांचे प्रमाण : ६८.२६%
२०१४ : १,५०,५८८ मते | मताधिक्य : ८९,७९१ | मतांचे प्रमाण : ६६.४५%
२०१९ : १,९५,६४१ मते | मताधिक्य : १,६५,२६५ | मतांचे प्रमाण : ८३.८०%
२०२४ : १,८१,१३२ मते | मताधिक्य : १,००,८९९ | मतांचे प्रमाण : ६६.३२%
सुनेत्रा पवारांचा नवा राजकीय टप्पा
या निकालासह सुनेत्रा पवार यांनी केवळ बारामतीची जागा राखली नाही, तर अजित पवारांचा राजकीय वारसाही अधिक भक्कमपणे पुढे नेल्याचे स्पष्ट केले. विक्रमी मताधिक्याने मिळालेला हा विजय सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.