केज : गेली १८ वर्षे शिक्षक म्हणून काम करूनही त्याचा पगार न दिल्याने धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली. ही आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या चिमुरडीबाबत फेसबुकवरून भावना व्यक्त केल्या. श्रावणी बाळा, या राक्षसांमुळे मी तुझ्यापासून दूर जात आहे. एक दळभद्री बाप म्हणून मी तुझ्या वाट्याला आलो. माझ्यासमोर कोणताच पर्याय त्यांनी ठेवला नाही, अशा शब्दांत नागरगोजे यांनी आपल्या भावना मांडल्या.
बीड जिल्ह्यातील केजमध्ये ही घटना घडली आहे. कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. धनंजय नागरगोजे हे १८ वर्षांपासून शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी पगार मागितला. त्यावर तू फाशी घे, असे उत्तर विक्रम बाबुराव मुंडेने दिल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. नागरगोजे यांना तीन वर्षांची मुलगी असून, तिच्यासाठी पोस्ट लिहून त्यांनी आत्महत्या केली.
"श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालेच, तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले; काय करू? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवले नाही किंवा कुणाचे कर्जही घेतले नाही, असे नागरगोजे म्हणाले.
श्रावणी बाळा, तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही. तुझे वय आहेच किती, तीन वर्षे. तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा, बापूंनी कधीच कुणाचे नुकसान केले नाही. सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. "विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ केला. मला हे हाल हाल करून मारणार आहेत, असे नागरगोजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.