महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने पिपाणी व तुतारी ही चिन्हे गोठवली

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह असलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’शी साधर्म्य असणारी ‘पिपाणी’ व ‘तुतारी’ ही मुक्त चिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह असलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’शी साधर्म्य असणारी ‘पिपाणी’ व ‘तुतारी’ ही मुक्त चिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील ‘पिपाणी’ व ‘तुतारी’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा लढवल्या होत्या. नाशिकसह सर्वच जागांवर ४ लाखांहून अधिक मतदान ‘पिपाणी’ला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत या चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला अवघ्या काही हजारांचे मताधिक्य महत्त्वाचे ठरत असते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने ‘पिपाणी’ चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

भाजपने ‘पिपाणी’ चिन्हाचा गैरफायदा घेतला. त्यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना मतांचा मोठा फटका बसला. निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादीच्या आक्षेपावर निर्णय घेऊन पिपाणी चिन्ह गोठवल्याने महाराष्ट्रात आता दिशा देणारी तुतारी वाजणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यानंतर घड्याळ कुठल्या राष्ट्रवादीचे, असा वाद निर्माण झाला. अखेर चिन्ह वादाचे प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेले. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह दिले, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिले.

साधर्म्य असलेल्या चिन्हांमुळे मतदारांमध्ये संभ्रम

लोकसभा निवडणुकीवेळी काही अपक्ष उमेदवारांना 'पिपाणी' हे चिन्ह देण्यात आले होते. ‘तुतारी वाजवणारा माणूस’, ‘पिपाणी’ आणि फक्त ‘तुतारी’ ही चिन्हे जवळपास सारखीच असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला, असे क्रास्टो यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी