महाराष्ट्र

मलकापूर नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा; समविचारी आघाडीचा चार जागांवर विजय, कार्यकर्त्यांचा जल्लोष

कराड शहरालगत असलेल्या मलकापूर (ता. कराड) नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवकांचे बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या समविचारी आघाडीच्या चार उमेदवारांनी विजय मिळवत भाजपसमोर आव्हान उभे केले.

रामभाऊ जगताप

कराड : कराड शहरालगत असलेल्या मलकापूर (ता. कराड) नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवकांचे बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या समविचारी आघाडीच्या चार उमेदवारांनी विजय मिळवत भाजपसमोर आव्हान उभे केले.

मागील अनेक वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून पालिकेचे सत्ताधीश राहिलेले आणि निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना समविचारी आघाडीच्या नवख्या उमेदवाराकडून चांगलीच टक्कर मिळाली. मनोहर शिंदे अवघ्या १६६ मतांनी विजयी झाले, तर भाजपमध्ये प्रवेश केलेले त्यांचे सहकारी राजेंद्र यादव आबा आणि प्रशांत चांदे यांचा धक्कादायक पराभव झाला.

रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. १२ टेबलांवर तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. बहुतांश प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी चांगली टक्कर दिली, मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही.

नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत भाजपचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी ५,२७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. सोनवणे यांना एकूण १०,७४९ मते मिळाली. राष्ट्रवादी समविचारी आघाडीचे उमेदवार आर्यन कांबळे यांना ५,४७२, तर शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार अक्षय मोहिते यांना केवळ ७०४ मते मिळाली. जोरदार प्रचार करूनही नवख्या आर्यन कांबळे यांना अपेक्षित मतदान मिळाले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अक्षय मोहिते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले असून त्यांना हजार मतांचाही टप्पा गाठता आला नाही.

निकाल जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. अनेक ठिकाणी विजयी मिरवणुकाही काढण्यात आल्या.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल