भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या तीघांपैकीच एकाला तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही काही नावांची चाचपणी सुरू झाली आहे.
भाजपकडून पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावेही चर्चेत होती. मात्र गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर पुण्यात झळकल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांचे नाव देखील मागे पडले आहे. त्यामुळे आता भाजपकडून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्याच नावाची चर्चा आहे.
पक्ष देईल ती जबाबदारी घेईन
‘‘पोटनिवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल, ती घ्यायला तयार आहे. उमेदवारीसाठी सगळेच इच्छूक असतात, मी पण इच्छूक आहे. मात्र, पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचे मी काम करेन. पक्ष सर्व्हे करेल, त्यात ज्याला पसंती भेटेल त्याचे नाव केंद्रीय समितीकडून जाहीर करण्यात येईल,’’ असेही संजय काकडे यांनी म्हटले आहे.