महाराष्ट्र

आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली असून या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके (३४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सोमवारी रात्री १०.३० ते ११च्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

अहिल्यानगर : भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली असून या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके (३४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सोमवारी रात्री १०.३० ते ११च्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश धस यांचा मुलगा सागर हा आष्टी येथून पुण्याला जात असताना त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. पारनेरच्या जातेगाव घाट फाट्याजवळ नितीन शेळके पारनेरच्या दिशेने जात असताना, मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, नितीन शेळके गंभीर जखमी झाले, मात्र नितीन शेळके यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या धडकेनंतर दुचाकीचे आणि सागर धस यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर मात्र ही कार सागर धस चालवत होता की अजून कोणी, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पण सागर धस हाच गाडी चालवत असल्याची चर्चा आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विविध आरोपांची राळ उठवणारे भाजप आमदार सुरेश धस चर्चेत आले होते. मात्र, आता लोकप्रतिनिधीच्या मुलाने एकाला उडवल्यामुळे प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत