संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

भाजपचीही 'घराणेशाही'! ९९ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

Maharashtra Assembly elections 2024 : अन्य पक्षांवर 'घराणेशाही'चा आरोप करणाऱ्या भाजपने विधानसभेसाठी रविवारी जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीवर 'घराणेशाही'चा पगडा दिसून येत आहे.

Swapnil S

मुंबई : अन्य पक्षांवर 'घराणेशाही'चा आरोप करणाऱ्या भाजपने विधानसभेसाठी रविवारी जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीवर 'घराणेशाही'चा पगडा दिसून येत आहे. भाजपने पहिल्या यादीत ७१ विद्यमान आमदारांना वा मातब्बर राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटे दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीत कोणताही धोका न पत्करता प्रभावशाली राजकीय घराण्यांना झुकते माप दिले आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघापैकी १४ जागांचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत पक्षाने १३ महिलांना तिकिटे दिली आहेत.

या यादीत काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले, त्यानंतर आता अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष व विद्यमान आमदार आशीष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा भाऊ अमल महाडिक यांना दक्षिण कोल्हापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांना भोकरदनमधून तिकीट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगामधून उमेदवारी मिळाली आहे.

दरम्यान, घाटकोपर पूर्व भाजपचा गड मानला जातो. प्रकाश मेहता यांनी यापूर्वी भाजपचा गड राखला, मात्र भाजपचे नेते पराग शहा आणि प्रकाश मेहता यांच्यात वादविवाद असल्याने यावेळी भाजपने पहिली यादी जाहीर करताना घाटकोपर पूर्वेला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे घाटकोपर पूर्वेला भाजप 'वेट अँड वॉच' भूमिकेत आहे.

महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे सांगणाऱ्या भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादीच जाहीर केली. भाजपच्या या निर्णयामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही आपल्या पक्षातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करतील, असे सांगण्यात येते.

यादीवर जातीय समीकरणाचा प्रभाव

भाजपने विदर्भातून सर्वाधिक कुणबी उमेदवार दिले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात व विदर्भामध्ये विद्यमान आमदारांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. भाजपसाठी कळीच्या ठरलेल्या मराठवाड्यामध्ये मराठा उमेदवार सर्वात जास्त देत मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये तीन अपक्षांनासुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये महेश बालदी यांचा समावेश आहे, तर अन्य दोन अपक्षांमध्ये राजेश बकाने यांना देवळी विधानसभा, तर विनोद अग्रवाल यांना गोंदिया मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते.

कल्याणमध्ये गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी

कल्याण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली, गायकवाड यांच्या या कृत्यामुळे भाजपनेही त्यावेळी नाराजी व्यक्त केली. मात्र होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविन - फडणवीस

भाजपने मला विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्यांदा संधी दिली. पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी तसेच इतर नेत्यांचा मी नितांत आभारी आहे. पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

या मतदारसंघात विद्यमान आमदारांचा पत्ता कट

अकोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली, आर्णी, नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, पेण, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस या मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

पहिल्या यादीमध्ये १३ महिलांना उमेदवारी

चिखली मतदारसंघातून श्वेता महाले, भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, फुलंबरी येथून अनुराधा चव्हाण, नाशिक पश्चिम येथे सीमा हिरे, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूर मतदानसंघातून मंदा म्हात्रे, दहिसर येथे मनिषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकुर, पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजले, श्रीगोंदा येथून प्रतिभा पाचपुते, कैजमधून नमिता मुंदडा या १३ महिलांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

चला, चला दिवाळी आली; खरेदीची वेळ झाली! मुंबईतील बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तोबा गर्दी

वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी; जागा पकडण्यातून दुर्घटना, १० प्रवासी जखमी, गर्दीमुळे 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती

…म्हणून 'आप' महाराष्ट्राच्या निवडणुकीत नाही; मविआने जागा देऊ केल्याचा भारद्वाज यांचा दावा

याद्यांचा धडाका! महायुती व महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर