महाराष्ट्र

Video : अयोध्येतील सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झाला होता राडा, आता मीरारोडमध्ये 'त्या' ठिकाणी प्रशासनाने चालवला बुलडोझर

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरारोड परिसरात घडली होती.

Rakesh Mali

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरारोड परिसरात घडली होती. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली होती. आता प्रशासनाने ज्या ठिकाणी राडा झाला तेथील बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या परिसरातील बेकायदेशीर बांधकामांना जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती धरली आहे. दोन बुलडोझरच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेली बांधकामे पाडण्यात आली. यावेळी काही अघटित घडू नये, तसेच खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून आला.

काय प्रकरण?

अयोध्येत सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर आदल्या रात्री मीरारोड आणि भाईंदर शहरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक मिरवणूक मीरारोडच्या हैदरी चौकातून जात असताना जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात हल्लेखोरांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करून वाहनाची तोडफोड केली. यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले, तर जवळपास २० जणांना किरकोळ मार लागला. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मध्यरात्री नयानगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे, तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

50 ते 60 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

नयानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवित शांतता निर्माण केली. ज्यांना मारहाण झाली, त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेत दंगल करणाऱ्या अनोळखी 50 ते 60 लोकांविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व सहाय्यक पोलीस आयुक्त महेश तरडे, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे हे तणावाला शांत करण्यासाठी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन