महाराष्ट्र

अपघातानंतर ४ तासांनंतर वाहन कर भरला, धक्कादायक प्रकार उघड

राज्य वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कर भरण्याच्या वेळेबाबत चिंता व्यक्त केली.

प्रतिनिधी

मुंबई : समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. यात १२ जण ठार, तर २३ जण जखमी झाले. या मिनी बसची क्षमता १८ असताना त्यात ३५ जण प्रवास करत होते. या मिनी बसकडे अपघाताच्या वेळी वैध परमीट नव्हते. तसेच यातील धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर ४ तासांनी या अपघातग्रस्त वाहनाचा कर भरण्यात आल्याचे उघड झाले. १ ते ३० सप्टेंबर व १ ते ३१ ऑक्टोबरचा कर १५ ऑक्टोबर पहाटे ४.१३ वाजता भरला. मात्र, अपघात १२.३० वाजता वैजापूर भागात झाला होता.

मिनी बसचा नोंदणी क्रमांक एमएच-०४ जीपी २२१२ हा नाशिक आरटीओत नोंदला आहे. पाच महिन्यांसाठी त्याचे परमीट जारी केले नव्हते. २० एप्रिल २०२३ मध्ये विशेष परमीट जारी केले होते. ते २० ते २३ एप्रिल दरम्यान नाशिक-गरूडेश्वर मार्गासाठी वैध होते. राज्य वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कर भरण्याच्या वेळेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ही मिनी बस वैध परमीटशिवाय धावत होती.

प्राथमिक तपासात ही भरधाव वेगाने जाणारी मिनी बस नाशिकला निघाली होती. ती वैजापूरजवळ एका कंटेनरला धडकली. पोलिसांनी ट्रकचालक ब्रीजेश कुमार चंडेल व दोन आरटीओ अधिकारी प्रदीप राठोड व नितीनकुमार गोणारकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या तिघांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने पाठवले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेसवरील नियमांच्या उल्लंघनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या महत्त्वाच्या रस्त्यांवर जीव धोक्यात असल्याने सुरक्षितता आणि अनुपालन मानकांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे.

१ जुलै रोजी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी बसला आग लागली होती. यात २५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर नऊ तासांनंतर या बसला पीयूसी प्रमाणपत्र जारी केले होते, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली