NEET Paper Leak : लातूरचे डॉ. शिरूरे यांना अटक; नीट पेपरफुटी तपासाचा मोहरा आता डॉक्टरांकडे  
महाराष्ट्र

NEET Paper Leak : लातूरचे डॉ. शिरूरे यांना अटक; नीट पेपरफुटी तपासाचा मोहरा आता डॉक्टरांकडे

देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने आणखी एक मोठी कारवाई करत लातूर शहरातील नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना अटक केली.

Swapnil S

लातूर : देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने आणखी एक मोठी कारवाई करत लातूर शहरातील नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना अटक केली. या कारवाईमुळे लातूरसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

रात्री उशिरा सीबीआयचे पथक औसा रोडवरील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी डॉ. शिरूरे यांची सुमारे तीन ते चार तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना नोटीस बजावत पुढील चौकशीसाठी पुणे येथे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. बुधवारी पुणे येथे चौकशीसाठी हजर झाल्यानंतर रात्री उशिरा सीबीआयने त्यांना अटक केली.

पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ही तिसरी अटक ठरली आहे. यापूर्वी पी. व्ही. कुलकर्णी तसेच आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. आता डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेमुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.

खैरनारला पुण्यात आणले

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिक येथून अटक करण्यात आलेला आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयने अटक केल्यानंतर त्यास दिल्ली येथे तपासाकरिता नेण्यात आले होते. त्यानंतर आता गुरुवारी त्याला पुण्यातील फुलेनगर येथील सीबीआय कार्यालयात आणून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. खैरनार याच्या संपर्कातील पुण्यातील विविध लोकांची माहिती काढण्यात आली असून त्याबाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे. आरोपी मनीषा मांढरे व मनीषा वाघमारे या देखील सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची खैरनारसोबत एकत्रित समोरासमोर चौकशी करण्यात येत आहे.

मागील तीन दिवसांपासून सीबीआयकडून राज्यातील विविध शहरांत विद्यार्थ्यांची व पालकांची चौकशी करण्यात येत आहे. पुणे, लातूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. प्राध्यापिका मनीषा मांढरे व ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या कात्रज परिसरात एकाच सोसायटीत राहण्यास असून त्यांनी कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा विशेष क्लास घेतला आहे, याबाबत देखील सीबीआयचे पथक सविस्तर तपास करत आहे. तसेच दोघींच्या हस्ताक्षराचे नमुने देखील घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

अभिषेक सिंग यांची हजेरी

नवी दिल्ली : दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी गुरुवारी एका संसदीय समितीसमोर हजेरी लावली. यावेळी त्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबत सविस्तर माहिती दिली.

सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे ५ तास चालली, ज्यामध्ये शिक्षण सचिव विनीत जोशी देखील उपस्थित होते.

संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंग म्हणाले की, बैठक अत्यंत समाधानकारक झाली असून सर्व सदस्यांकडून महत्त्वपूर्ण सूचना मिळाल्या आहेत. NTA परीक्षांसारख्या विषयांवर सर्व सदस्य "अतिशय चिंतित" असल्याचे नमूद करत, त्यांनी सद्यस्थितीत अधिक तपशील देण्यास नकार दिला. पुढील बैठकीबाबत विचारले असता, त्यांनी "बघूया" असे म्हणत काहीही स्पष्ट केले नाही.

महाराष्ट्रातील प्रवेश लांबणीवर

मुंबई : नीट यूजीची आगामी फेरपरीक्षा जून महिन्यात होणार असल्याने, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. यामुळे शैक्षणिक सत्रालाही विलंब होण्याची शक्यता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी सेलने जून अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, २१ जून रोजी नियोजित असलेल्या फेरपरीक्षेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलावी लागणार आहे. राज्यातील नऊ अभियांत्रिकी शाखा आणि फार्मसीच्या १५ टक्के जागा (अखिल भारतीय कोट्यातील) या नीटच्या गुणांवर आधारित असतात. जोपर्यंत फेरपरीक्षा होऊन निकाल जाहीर होत नाही, तोपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही.

खत तुटवड्याचे मोठे संकट; खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

भाषणांचा अमृतकाळ, जनतेसाठी संकटकाळ

आजचे राशिभविष्य, २२ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Beauty Tips : मेकअप काढताना 'या' चुका टाळा; नाहीतर त्वचा होऊ शकते खराब

Badam Milk Benefits: थकवा होईल छू मंतर! रोज प्या चविष्ट बदाम दूध; जाणून घ्या सोपी रेसिपी