पुणे : नागपूर आणि पुणे या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या होत्या. नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत, त्याची कारणे शोधून चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले. महायुतीतील घटकांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यावर टीका केली. धंगेकर यांनी संयम बाळगावा आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
ईव्हीएम आणि मतदार यादीबाबत बोलताना, भाजप बॅलेट पेपरवरील निवडणुकांतही विजयी झाला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
विजय झाला की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की मशीन खराब, अशी भूमिका योग्य नसल्याचे ते म्हणाले. मतदार यादी पूर्णपणे रद्द करून नव्याने तयार करण्याच्या भूमिकेशी असहमती दर्शवत, याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कर्जत दौऱ्याबाबत बोलताना, राज्यात विविध ठिकाणी विकास प्रकल्प उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मात्र, विकासासोबत वृक्षसंवर्धनही महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची रक्कम अंतिम मदत नसून अग्रीम मदत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.