संग्राहित छायाचित्र 
महाराष्ट्र

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये निवडणूक ऐन रंगात आलेली असताना वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/ मुंबई

राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये निवडणूक ऐन रंगात आलेली असताना वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर गायब झाले आहेत, तर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळही नाराज असल्याची चर्चा आहे. नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर ते दिसले. परंतु, प्रचारात ते फारसे सक्रिय नसल्याची मतदारसंघात चर्चा आहे. भुजबळांच्या नाराजीची चर्चा समोर येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी शुक्रवारी लगेचच भुजबळांच्या फार्म हाऊसवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि नाराजीची चर्चा फेटाळून लावली.

नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला हवा होता. त्यासाठी छगन भुजबळ यांनी जोर लावला होता. एवढेच नव्हे, तर भाजप पक्षश्रेष्ठींनीदेखील भुजबळ यांनाच उमेदवारी द्यावी अशा सूचना दिल्या होत्या, असे सांगितले जात होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आणि अखेरपर्यंत ती सोडली नाही. विशेष म्हणजे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विरोध असतानादेखील शिंदे यांनी त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजी असल्याची सुरुवातीपासूनच चर्चा रंगली होती. त्यातच ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिक, दिंडोरीत प्रचाराची धूम सुरू असताना फारसे सक्रिय दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा अधिकच रंगली. या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खुद्द हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांची भेटही घेतली. परंतु, भुजबळ फारसे सक्रिय झाले नाहीत. त्यामुळे संशय बळावला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असताना पिंपळगाव बसवंत येथील सभेत भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारीच बसले होते. त्यांनी कांद्याच्या प्रश्नावर त्यांना निवेदनही दिले. त्यामुळे आता भुजबळ प्रचारात सक्रिय होतील, असे बोलले जात होते. तसेच त्यांची नाराजीही दूर झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु मोदींच्या दौऱ्यानंतर पुन्हा ते सक्रिय झाले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. तसेच राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळ नाराज असल्याचे आपल्या कानावर आलेले आहे. परंतु, त्यांचे आणि माझे काही बोलणे झालेले नाही, असे आज सांगून टाकले. त्यामुळे नाराजीच्या चर्चेने जोर धरला.

तटकरे शरद पवारांना भेटले?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. शरद पवार नाशिकमधील हॉटेलमध्ये मुक्कामी असताना त्यांची भेट झाली असल्याचे देशमुख म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, अजित पवार गटात नेमके काय चालले आहे, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार आणि मी एकाच हॉटेलात मुक्कामाला होतो. मात्र, अशी काही भेट झाली नसल्याचे पाटील म्हणाले आणि तटकरे यांच्या भेटीचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.

गिरीश महाजन यांनी घेतली भेट

छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगताच नाशिकचे पालक मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन तत्काळ नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यांनी थेट भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. परंतु, महाजन यांनी भुजबळ नाराज असल्याची चर्चा फेटाळून लावली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी