महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj statue: शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या; विरोधक आक्रमक

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तर विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या वतीने राज्यातील कोल्हापूर, नाशिक येते निदर्शने करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तो महिन्यांपूर्वी उभारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ८ महिने २२ दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तर विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या वतीने राज्यातील कोल्हापूर, नाशिक येते निदर्शने करण्यात आली.

मोदी जिथे हात लावतात ते उद्ध्वस्त होते; संजय राऊतांचा घणाघात

प्रत्येक गोष्टीत श्रेयासाठी धडपड, कोस्टल रोडला गळती, अयोध्येतील राम मंदिरात गळती या सर्वांचा अर्थ मोदींनी जिथे हात लावतात ते उध्वस्त होते, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केला आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी राज्य व केंद्र सरकारवर केला.राऊत म्हणाले की, मराठीत म्हण आहे हात लावीन ते सोने होईल, मात्र पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते. अयोध्येच्या राम मंदिरात गळती, नवीन संसद भवनाला गळती, ज्या पुलांचे उद्धाटन केले, ते पूल उध्दवस्त झाले, कोस्टल रोडला गळती, अटल सेतूला भेगा पडल्यात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पाहिले तर तोही उद्धवस्त झाला. गेल्या ७० वर्षात हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील त्यांनी जिथे जिथे हात लावला ते उद्धवस्त झाले आहे. आणि देशही उद्धवस्त होत आहे.

राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा - नाना पटोले

मुंबई : पुतळा कोसळल्या प्रकरणी केवळ ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले म्हणाले की, पुतळा कोसळण्याची घटना म्हणजे शिवरायांसह शिवप्रेमींचा अपमान आहे. राज्य सरकारमधील मंत्री आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन करणार नाही.

पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर आहे, या कामावर २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर ५ कोटी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आले. समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करणे गरजेचे, मात्र श्रेय घेण्याच्या आणि कमीशनच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष न देता महाराजांचा अवमान केला, असा आरोप त्यांनी केला. 

पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराजांचे नाव घेऊन मते मिळवण्यासाठी घाईगडबडीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मोदी यांच्या हस्ते संसदेचे उद्घाटन केले त्या वास्तूला गळती लागली, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले मंदिराला गळती लागली, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले, त्याला भेगा पडल्या, हा नरेंद्र मोदींचा हातगुण म्हणायचे की काय असा प्रश्न पडतो. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुने आदर्श तर केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी हे नवे आदर्श, असे म्हणत नितीन गडकरींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अपमान करणे हीच भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांची मानसिकता झाली आहे, असे खडे बोल नाना पटोले म्हणाले.

एरव्ही बोलणारे आता शांत कसे - आव्हाड 

देव, देश आणि धर्मासाठी जगणारा, संपूर्ण देश छत्रपती ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी महाराज रक्तगटाचा आणि हिंदवी स्वराज्याचा दिवा काळजात लावणारा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. असा समाज घडविण्यासाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज याशिवाय दुसरा मंत्र नाही, पण त्यासाठी शिवचरित्र वाचणे गरजेचे आहे, असे भिडे गुरुजी यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, राज्यात नको इतके पुतळे आहेत, असे सांगत त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध दर्शविला आहे, हे उल्लेखनीय. याच मुद्द्यावर एक्सवर ट्विट करत आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. एरवी बोलणारे आज शांत आहेत. त्यांना सांगा, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दोषींवर तातडीने कारवाई करावी - सतेज पाटील 

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत मंगळवारी मालवण येथील पुतळा दुर्घटना स्थळी भेट देत माहिती आपण घेतली. त्याठिकाणी असणारे पुतळ्याचे अवशेष पाहून मनाला वेदना झाल्या. ज्या शिवछत्रपतींनी रयतेच्या सुखासाठी स्वराज्य उभे केले, त्यांचा कोसळलेला पुतळा पाहण्याचे दुर्भाग्य आमच्या वाट्याला आले, असे काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले.प्रत्येक गोष्टीचा केवळ गाजावाजा करणाऱ्या इव्हेंटबाज सरकारने आमच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान केला आहे. याबाबत जनभावना तीव्र आहेत. सरकारने दोषींवर तातडीने कारवाई करावी. त्यात हयगय सहन केली जाणार नाही, असेही पाटील म्हणाले.

चौकशी समिती नेमली का - वडेट्टीवार

विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, चोवीस तास होत आले, राज्य सरकारने चौकशी नेमली का, असा सवाल उपस्थित केला आहे. नौदल आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्राचा जनतेला कळले पाहिजे की हे कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले? कंत्राट देण्यासाठी काय प्रक्रिया राबवली?, असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी