महाराष्ट्र

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

राज्यात सर्वत्र पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो पावले विठ्ठलाच्या भक्तीत निघाली असताना, वारीतील शिस्त, सेवाभाव आणि प्रेमभावनेला धक्का देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा व्हिडिओ असून, एका चोपदाराने महिला वारकऱ्याशी उद्धट वर्तन करत तिला ढकलल्याचे या क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

नेहा जाधव - तांबे

राज्यात सर्वत्र पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो पावले विठ्ठलाच्या भक्तीत निघाली असताना, वारीतील शिस्त, सेवाभाव आणि प्रेमभावनेला धक्का देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा व्हिडिओ असून, एका चोपदाराने महिला वारकऱ्याशी उद्धट वर्तन करत तिला ढकलल्याचे या क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

वेळापूरहून प्रस्थान करून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गुरुवारी (३ जुलै) उघडेवाडी येथे पोहोचली. येथे माऊलींचे पारंपरिक उभे रिंगण पार पडत असताना, काही महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत होत्या. यावेळी एक महिला रिंगणाच्या मार्गात आली. यावेळी चोपदारांनी गर्दीत पुढे येऊन त्या महिलेला जोरात ढकललं. त्यामुळे ती महिला थेट समोर बसलेल्या इतर वारकऱ्यांवर जाऊन पडली. विशेष बाब म्हणजे, त्या महिलेने डोक्यावर पितळेची तुळस घेतली होती, जी पडल्यामुळे त्या महिलेला अथवा समोरील वारकऱ्यांना इजा पोहचण्याची शक्यता होती.

एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून संबंधित चोपदार महिलेवर मोठमोठ्याने ओरडत तिला दोष देत होते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

शेखर या युजरने 'एबीपी माझा'ने 'X'वर पोस्ट केलेला व्हिडिओ शेअर करत म्हंटले, की ''प्रदक्षिणेवेळी वारकरी महिला मध्ये आली, चोपदाराने ढकलून दिलं. चोपदार तुम्ही सेवेकरी आहात मालक नाही, त्या माय माउलीला सांगितलं असते तर ती स्वतः बाजूला गेली असती ढकलायची काय गरज?'' असा प्रश्न विचारला.

तर, त्याच पोस्टवर राजेश भोकरे यांनी ''ह्या सेवेकरी चोपदाराला तात्काळ पदमुक्त करा....हा वारी आणि वारकऱ्याला कलंक आहे...'' असे म्हंटले आहे.

अजित यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हंटले, की ''अरे बापरे, ही कुठली संस्कृती? असं महिलेला ढकलून द्यायचं! ते पण वारीत! अशा दूषित मानसिकतेवर कारवाई व्हायलाच पाहिजे.''

वारकरी संप्रदायाच्या मूल्यांना धक्का -

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी म्हणजे भक्ती, शिस्त, नम्रता आणि प्रेमाचा मूर्तिमंत संगम. "माऊली" म्हणजे आई आणि तिच्या नावाने चालणाऱ्या या वारीमध्ये अशाप्रकारे एका महिला वारकऱ्याशी केलेली अशोभनीय वागणूक हे अत्यंत वेदनादायक आहे. नेटकऱ्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून चोपदाराच्या अशा वर्तनावर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक