मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरी अँड फॉरवर्डिंग युनिटचा औषध विक्री परवाना रद्द केला आहे. रियॅक्टिन टॅब्लेट प्लस या औषधाच्या पॅकेजिंग, साठवणूक आणि बाजारातून परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. २७ ऑगस्टपासून परवाना रद्द करण्याचा आदेश लागू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील वडकी येथील कंपनीच्या मुख्य गोदामाची तपासणी केल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान औषधे थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे तसेच मुदतबाह्य औषधांच्या हाताळणीसंदर्भातील प्रक्रियेत त्रुटी असल्याचे आढळून आले.
यापूर्वी जूनमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत या औषधाच्या पॅकेजिंगवर अनधिकृतपणे ‘वेदनाशामक आणि ताप कमी करणारे औषध’ असा दावा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे औषध शेड्यूल एच अंतर्गत येत असून, अशा प्रकारची जाहिरात कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याचे एफडीएने म्हटले आहे.