मुंबई : शिवसेना मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला पाठ यामुळे महायुतीतील मोठा भाऊ भाजप आणि घटक पक्ष शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. हुतात्मा चौक येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकमेकांच्या जवळ उभे असतानाही त्यांच्यात नेहमीचा संवाद, उत्साह आणि सहजता दिसली नाही. दोघांची तणावपूर्ण देहबोली पाहता महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. मात्र, यावेळी फडणवीस आणि शिंदे यांनी आपसात कोणताही संवाद साधला नाही. दोघेही आमनेसामने आले तरी दोघांची देहबोली मात्र पूर्णपणे बदललेली दिसली. औपचारिक नमस्कारानंतरही नजरा टाळणे, संवाद न घडणे आणि वातावरणातील ताण स्पष्ट जाणवत असल्याने महायुतीतील दुरावा आता उघडपणे समोर आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शहांच्या भेटीनंतरही शिंदे नाराज
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिंदे गटातील नगरसेवकांना मोठे आमिष दाखवून फोडाफोडी होत असल्याच्या आरोपांमुळे नाराजी वाढली. अखेर शिंदे यांनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, शहा यांनी फक्त परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगून ठोस आश्वासन न दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर बिहारच्या शपथविधीसाठी फडणवीस-शिंदे यांनी स्वतंत्र प्रवास केला आणि कार्यक्रमातही दोघांमध्ये जवळपास कोणताही संवाद न झाल्याने वैचारिक अंतर आणखी स्पष्ट झाले.