'गुंगी गुडिया'वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान; काँग्रेस कार्यालयात घुसून अजित पवार गटाची घोषणाबाजी 
महाराष्ट्र

'गुंगी गुडिया'वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान; काँग्रेस कार्यालयात घुसून अजित पवार गटाची घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरदार राजकीय घमासान झाले.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरदार राजकीय घमासान झाले.

राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कुलाबा येथील काँग्रेसच्या ‘गांधी भवन’ कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्या बीड जिल्हा दौऱ्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात आमदार धनंजय मुंडे बोलत असताना शांत बसल्यामुळे, ‘सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर

महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते. मुळातच महिलांना राजकारणात नगण्य स्थान आहे. एखादी महिला जर राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न विचारायचा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देण्याचा मंत्र्यांचा, अशी प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेसच्या मनात घृणा आणि द्वेष : धनंजय मुंडे

सुनेत्रा पवार यांच्याविषयी ‘गुंगी गुडिया’ हा उल्लेख म्हणजे काँग्रेसच्या मनात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी असलेली घृणा आणि द्वेष याचे द्योतक असल्याची टीका अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ही प्रत्येक महिलेच्या सन्मानावरील टीका : जय पवार

सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते जय पवार यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नाही : हर्षवर्धन सपकाळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेला ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नाही, शिवी नाही किंवा असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते. पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे, असा खुलासा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर आता शुल्क; केंद्रीय अर्थखात्याकडून अखेर संसदेत विधेयक सादर

WhatsApp वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी होणार; डीपीडीपीसारख्या कायद्यांचे पालन करण्यासाठी चाचणी करणार

भेसळ प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास निवृत्ती; माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

दहिसर, मीरा-भाईंदर मेट्रो वर्षअखेरीस सेवेत? अंतिम टप्प्याची चाचणी सुरू; ९० टक्के काम पूर्ण

Pune : आळंदीत १५० कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश; पोलिसांनी आंतरराज्यीय सायबर रॅकेट केले उद्ध्वस्त