महाराष्ट्र

बंडखोर आमदारांचे तिकीट काँग्रेस कापणार? परिषदेच्या निवडणुकीतील गद्दारी भोवणार

१२ जुलै रोजी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

गिरीश चित्रे

मुंबई: जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. पक्षाच्या नावाखाली व्यापार करणाऱ्यांना पक्षात थारा नाही. १२ जुलै रोजी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. दरम्यान, या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचे तिकीटच येत्या विधानसभा निवडणुकीत कापण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे कळते.

येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात सर्वेक्षण केले जात आहे. जनतेने संबंधित आमदारांबाबत सकारात्मक मत दिल्यास त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे पटोले यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत व्हीपचे उल्लंघन करत क्रॉस वोटिंग करणाऱ्यांबाबत काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका सारखीच आहे. काँग्रेस पक्षात चुकीला माफी नाही, अशी भूमिका काँग्रेस हायकमांडने घेतली आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महायुतीला राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाची चिंता नाही

राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांसह जनतेचे नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस तर काही भागात दुष्काळ अशी स्थिती असताना भाजप-शिवसेना अर्थात महायुतीचे सरकार विविध घोषणांचा पाऊस पाडत आहे. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. पंचनामे करुन तत्काळ नुकसानभरपाई देण्याचे सोडून महायुती आपलीच राजकीय पोळी भाजून घेत आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील जमिनी गुजरातच्या मित्राला विकल्या जात आहेत. राज्याचा स्वाभिमान विकला जात आहे. गुजरात येथून अंमली पदार्थ आणून महाराष्ट्रातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी ढकलण्याचे काम भाजप करत आहे. महायुतीला राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाची चिंता नाही, अशी टीका त्यांनी केली.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास