मुंबई : सर्व दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरच्या धोक्याचा इशारा देणारा संदेश छापण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मुख्य न्या. अलोक आराधे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गुरुवारी या याचिकेवर राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली. तसेच याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना अनुसरून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
पुण्यातील २४ वर्षीय यश चिलवार या तरुणाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲॅड. पूजा फागणेकर देशात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याचा इशारा देणे आवश्यक आहे. कर्करोगाचा इशारा हटवल्याने मद्यप्रेमींच्या जीविताला धोका आहे, असे सांगितले.
याचिकेतील ठळक मुद्दे
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अल्कोहोलला गट1 (सर्वात जास्त धोकादायक) कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे. अल्कोहोलयुक्त पेये कर्करोगाला आमंत्रण देतात. ही एक गंभीर वस्तुस्थिती आहे. याचा दारूच्या बाटल्यांवरील लेबलिंगवर विशिष्ट आणि ठळक उल्लेख करणे आवश्यक आहे. सध्या अशा लेबलिंगचा अभाव आहे.
जेव्हा एखादा ग्राहक एखादे उत्पादन खरेदी करतो तेव्हा संबंधित उत्पादनाची मूळ व संपूर्ण स्वरूपातील माहिती जाणून घेणे हा त्या ग्राहकाचा हक्क आहे.