महाराष्ट्र

जरांगे-पाटील यांच्या विरोधात फौजदारी याचिका

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी साखळी उपोषण करण्यावर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर धारणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात पंढरपूरमधील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा. तसेच त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने २२ जानेवारीला सुनावणी निश्‍चित केली.

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी साखळी उपोषण करण्यावर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंढरपूर येथे एका माळी समाजाच्या विकलांग तरुणाने आत्महत्या केली. सुरुवातीला ही आत्महत्या मराठा आंदोलनाला समर्थन म्हणून भासविली गेली. मात्र, त्यानंतर तो तरुण माळी समाजाचा असल्याचे उघड झाले. असे असताना ही आत्महत्या नाही तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेली हत्या आहे, असा दावा याचिकेत करताना या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्या. तसेच आंदोलनकर्ते प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.

तसेच मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत आंदोलन आणि उपोषण करण्यावर ठाम आहेत. या आंदोलनाला राज्यातून सुमारे दोन कोटी मराठा समाजबांधव दाखल होण्याची वल्गना केली जात आहे. त्याचा ताण मुंबई शहरावर पडून सर्व यंत्रणा कालमडू शकेल, अशी भीती याचिकेत व्यक्त करताना, मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती