महाराष्ट्र

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

पुण्यातील उरुळी कांचन परिसरात २७ वर्षीय इंजिनिअर दीप्ती मगर-चौधरीने आत्महत्या केली. सतत हुंडा मागणी, मानसिक व शारीरिक छळ आणि जबरदस्तीचा गर्भपात यांमुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं, तिने तीन वर्षांच्या मुलीसमोरच आत्महत्या केली.

Mayuri Gawade

पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची चर्चा अजून थांबलेली नाही, तोच उरुळी कांचन परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात सुसंस्कृतपणाचा मुखवटा लावून वावरणाऱ्या, पदं आणि प्रतिष्ठा मिरवणाऱ्या कुटुंबात एका उच्चशिक्षित इंजिनियर विवाहितेला हुंडा, संशय, अपमान आणि 'वंशाला दिवा हवा' अशा विकृत आग्रहामुळे जीव गमवावा लागला. सासू सरपंच, सासरे शिक्षक… पण घरातल्या चार भिंतीआड अमानवी छळ सुरू होता. अखेर या सगळ्याला कंटाळून इंजिनियर दीप्ती मगर-चौधरीने आत्महत्या केली आणि पुणे पुन्हा एकदा हादरलं.

दीप्ती मगर-चौधरीने केली आत्महत्या

उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे राहणाऱ्या दीप्ती मगर-चौधरी (वय २७) या पेशाने इंजिनियर असलेल्या विवाहितेने २५ जानेवारी रोजी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीसमोर तिने हे टोकाचं पाऊल उचललं. दीप्तीचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं असलं, तरी तिच्यामागे असलेली कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

लग्नानंतर काही महिन्यांतच छळाला सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा विवाह २०१९ मध्ये पार पडला होता. लग्नावेळी माहेरकडून सुमारे ५० तोळे सोनं देण्यात आलं होतं. सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेले, मात्र त्यानंतर दीप्तीच्या आयुष्यात छळ, संशय आणि अपमानाची मालिका सुरू झाली.

'दिसायला सुंदर नाहीस', 'घरकाम येत नाही' - मानसिक छळ

दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेतला जाऊ लागला. “तू दिसायला सुंदर नाहीस”, “तुला घरातली कामं जमत नाहीत”, “शेतात राबणाऱ्या बाया तुझ्यापेक्षा बऱ्या” अशा शब्दांत तिला सातत्याने अपमानित करण्यात येत होतं. पती, सासू-सासरे आणि दीर यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता.

व्यवसाय, गाडी… आणि माहेरून पैशांची सतत मागणी

पती रोहन चौधरी याचा एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचं कारण पुढे करत दीप्तीकडे माहेरून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. मुलीचा संसार वाचावा म्हणून दीप्तीच्या आई-वडिलांनी एकदा तब्बल १० लाख रुपये रोख दिले. मात्र यावरही समाधान न झाल्याने, चारचाकी गाडी घेण्यासाठी पुन्हा २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर माहेरकडून एकूण सुमारे ३५ लाख रुपये देण्यात आले.

५० तोळे स्त्रीधन बळकावल्याचा आरोप

लग्नात दिलेलं सुमारे ५० तोळे सोनं चोरीची भीती दाखवून सासू आणि पतीने दीप्तीकडून काढून घेतल्याचा आरोप आहे. नंतर विचारणा केल्यावर हे सोनं व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं तिला सांगण्यात आलं. दीप्तीचं स्वतःचं स्त्रीधनही तिच्या हातात राहिलं नाही.

मुलगी झाल्यावर नाराजी, 'वंशाला दिवा हवा' असा विकृत हट्ट

दीप्तीला पहिली मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्याने सासरच्यांची नाराजी वाढली. 'वंशाला दिवा हवा' हा विकृत आग्रह घरात सतत ऐकवला जाऊ लागला. याच मानसिक दबावात दीप्ती आणखी खचत गेली.

२०२५ मध्ये जबरदस्तीने गर्भलिंग निदान, त्यानंतर गर्भपात

नोव्हेंबर २०२५ मध्ये दीप्ती पुन्हा गर्भवती होती. पाच महिन्यांची गरोदर असताना सासरच्यांनी तिच्यावर जबरदस्तीने गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी दबाव टाकला. पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच, दीप्तीचा विरोध डावलून तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर दीप्ती पूर्णपणे कोलमडली होती.

सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात अमानवी वागणूक

ऑक्टोबर २०२५ मध्ये दीप्तीच्या सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या. निवडणूक, राजकीय प्रतिष्ठा आणि 'मोठेपणा' दाखवण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. तसेच माहेरच्या रो-हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठीही दीप्तीवर दबाव टाकण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे.

अखेर आत्महत्या; तिन्ही वर्षांच्या मुलीसमोर टोकाचं पाऊल

सततचा छळ, अपमान, संशय, पैशांची मागणी आणि जबरदस्तीचा गर्भपात… या सगळ्याला कंटाळून २५ जानेवारीच्या रात्री दीप्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. तिच्या मृत्यूने संपूर्ण सोरतापवाडी हादरली.

पती, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

दीप्तीची आई हेमलता मगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू व सरपंच सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती आणि सासूला अटक करण्यात आली असून, त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासरे आणि दीर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत, “हा केवळ आत्महत्येचा नव्हे, तर हुंडाबळीचा प्रकार आहे,” असं स्पष्ट केलं.

गर्भपाताची स्वतंत्र चौकशी

रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की, गर्भपात कोणत्या रुग्णालयात करण्यात आला, कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरून केला याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेश वैद्यकीय विभाग आणि पोलिसांना देण्यात आले आहेत.

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा