मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही नेत्यांकडून घातपाताची शक्यता व्यक्त होत असल्याने राज्यातच नव्हे तर देशभरात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, आज आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांच्या विमान अपघाताच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत बुधवारी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण सीबीआय आणखी व्यापकतेने तपास करू शकते. ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात, त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही अपघाती प्रकरणाचा तपास करत असतात. त्यामुळे या प्रकरणाचा सखोलतेने तपास व्हावा. अपघाताबाबत जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातील नव्हे तर देशातील जनतेसमोर आणावेत ही पक्षाची भूमिका असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.