सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन X
महाराष्ट्र

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

दिवाळीनिमित्त ग्रामीण नागपूरच्या दौऱ्यावर असताना स्थानिक शेतकरी आणि सरपंचांशी संवाद साधल्यानंतर सिंचन, पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी आवश्यक सुविधांबाबत राज्य सरकार तातडीने कार्यवाही करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

नवशक्ती Web Desk

नागपूर : दिवाळीनिमित्त ग्रामीण नागपूरच्या दौऱ्यावर असताना स्थानिक शेतकरी आणि सरपंचांशी संवाद साधल्यानंतर सिंचन, पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी आवश्यक सुविधांबाबत राज्य सरकार तातडीने कार्यवाही करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

दरम्यान, लोहारी सावंगा गावातील एका शेतकऱ्याच्या घरी रात्रभर मुक्काम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकाबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांचे आचरण हे वंचित घटकांच्या सेवेसाठी आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘मोदीजी समाजातील विविध घटकांशी, विशेषतः वंचित, शेतकरी आणि दिव्यांग व्यक्तींशी अत्यंत आपुलकीने संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्राधान्य देतात. त्यांच्या या आचरणातून आम्हालाही अशाच पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळते’.

संवादातून महत्त्वाच्या प्रश्नांबाबत स्पष्टता

ग्रामीण भागातील नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी झालेल्या संवादातून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत स्पष्टता आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘काल शेतकऱ्यांशी आणि आज सरपंचांशी झालेल्या चर्चेत पिण्याचे पाणी, सिंचन तसेच पशुधनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांची उपलब्धता अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत. या सर्व प्रश्नांवर राज्य सरकार तातडीने कार्यवाही करेल’, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘या भागातील पाण्याची तीव्र टंचाई फळबागांसाठी मोठा धोका ठरत आहे. अनेक वर्षांपासून वाढवलेली फळझाडे पाण्याअभावी वाळून गेली, तर नव्याने झाडे लावून त्यांना फळे येण्यास सात ते बारा वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सध्या ही झाडे वाचविणे हे आमचे सर्वांत मोठे प्राधान्य आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. आम्ही बोअरवेल खोदण्यावर निर्बंध घातले होते. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागा वाचवण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोदण्याची परवानगी दिली आहे," असे ते म्हणाले.

शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाने बळ मिळाले

मुक्कामाची व्यवस्था केल्याबद्दल शेतकरी रामभाऊ बालपांडे आणि त्यांच्या पत्नी अरुणा बालपांडे यांचेही मुख्यमंत्र्यांनी मनापासून आभार मानले. त्यांच्या घरी मुक्काम केल्याने मला खूप बळ आणि आत्मविश्वास मिळाला. एका अर्थाने त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या घरी राहण्याचा मला मनापासून आनंद झाला. रात्री खूप छान झोपही लागली, असे फडणवीस यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

'नोटाबंदी'ने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, 'व्होटचोरी'मुळे लोकशाही धोक्यात; पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल

दिमागी नक्षलचा धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, जवानांसोबत साजरी केली दिवाळी