"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया  (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

कोणतेही आंदोलन नेतृत्वविरहित किंवा फेसलेस झाले की काही स्वार्थी घटक त्यात घुसखोरी करून परिस्थितीचा गैरफायदा घेतात. दिल्लीतील आंदोलनातही...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली असून, त्यांनी वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर आणखी गंभीर आणि अनावश्यक घटना घडल्या असत्या, असे फडणवीस म्हणाले. तसेच, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार असला तरी हिंसाचार आणि अराजकता कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, अधिकारांसोबत जबाबदाऱ्याही येतात. योग्य परवानगी घेऊन शांततेत आंदोलन करणाऱ्यांना कुणीही अडवत नाही. पण परवानगीशिवाय आंदोलन, हिंसाचार किंवा राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तर त्यावर कायद्यानुसार कारवाई होणारच."

'नेतृत्वविरहित आंदोलनात स्वार्थी घटक घुसतात'

फडणवीस म्हणाले की, कोणतेही आंदोलन नेतृत्वविरहित किंवा फेसलेस झाले की काही स्वार्थी घटक त्यात घुसखोरी करून परिस्थितीचा गैरफायदा घेतात. दिल्लीतील आंदोलनातही काही राजकीय पक्ष आणि मूळ मुद्द्याशी संबंध नसलेल्या संघटनांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

'सरकारला लाठीचार्ज आवडत नाही; पण...'

मुख्यमंत्री म्हणाले, "कोणत्याही सरकारला नागरिकांवर लाठीचार्ज करायला आवडत नाही. पण, काल निर्माण झालेल्या परिस्थितीत पोलिसांनी नियंत्रण मिळवले नसते, तर आणखी गंभीर आणि अनावश्यक घटना घडल्या असत्या. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत आवश्यक तेवढीच कारवाई केली."

'सर्व आंदोलकांवर आरोप नाही'

"अनेकजण चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आंदोलनात घुसखोरी करून अराजकता निर्माण केली आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मूळ प्रश्नाशी संबंध नसलेले काही लोक आंदोलनाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते," असा आरोपही त्यांनी केला.

नीट-यूजी २०२६ पेपरफुटीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२०) जंतर-मंतरवरील 'चलो संसद' मोर्चा हिंसक वळणावर पोहचला.पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला, तर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहतात? आता NHAI चा डिजिटल लोकल पास मिळवा RajmargYatra App वरून, जाणून घ्या डिटेल्स