लोकशाहीमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलो, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; 'जेन झी'शी केला संवाद  
महाराष्ट्र

लोकशाहीमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलो, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; 'जेन झी'शी केला संवाद

भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या सामर्थ्यामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीलाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

नागपूर : भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या सामर्थ्यामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीलाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

नागपुरात ‘मंथन ४ युवा’ या जनरेशन-झेडसाठी आयोजित कार्यक्रमात प्रश्नोत्तरांच्या सत्रात ते बोलत होते. आपल्या संविधानाने देशाला लोकशाही दिली आहे. या लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे देवेंद्र फडणवीससारख्या व्यक्तीने नगरसेवक होण्याचीही कल्पना केली नसताना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे. रेल्वे स्थानकावर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले.

राजकारणात प्रवेश करताना आपण केवळ विचारांनी प्रेरित होतो, असे फडणवीस यांनी सांगितले. “त्या वेळी आमच्या विचारांमुळे आणि आम्ही ज्या पक्षात काम करत होतो, त्यामुळे सत्तेपर्यंत पोहोचू, असे वाटत नव्हते. आपण कायम विरोधी पक्षातच राहण्यासाठी जन्माला आलो आहोत, असे आम्हाला वाटायचे. दररोज आंदोलने आणि संघर्ष सुरू असायचा. मात्र, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि एक-एक पायरी चढत अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर आली,” असे ते म्हणाले.

राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यानच्या संघर्षाची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

तुरुंगवासाची आठवण

“वयाच्या २०व्या वर्षी बदायूं केंद्रीय कारागृहात १८ दिवस होतो. प्रयागराजहून अयोध्येकडे जात असताना भाषणे आणि वक्तृत्वाचा परिणाम प्रथमच जवळून पाहिला. आमच्यावर गोळीबार झाला, लाठीमार करण्यात आला आणि आम्हाला अटक करण्यात आली. तुरुंगातून परतल्यानंतरही मी पुन्हा आंदोलनात सहभागी झालो. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळीही मी तिथे होतो. त्याचा मला अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले.

राज्यातील स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने चांगले धोरण तयार केले असून निधीची तरतूद, इनक्युबेशन केंद्रांची निर्मिती आणि त्यांचे विकेंद्रीकरण करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

“टियर-३ शहरातील एखाद्या युवकाकडे कल्पना असेल आणि त्याचे व्यावसायिक उत्पादनात रूपांतर करण्याची इच्छा असेल, तर त्याला सरकारकडून पूर्ण मदत आणि १०० टक्के सहकार्य मिळेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोचिंग क्लासेसना चाप! प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध; इंटिग्रेटेड कोचिंगसह १३ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास बंदी; साप्ताहिक सुट्टीची सक्ती

Mumbai : मैदाने वाचवण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर; पालिकेसमोर आंदोलनाचा आदित्य ठाकरेंचा इशारा

नर्सिंगचा पेपरही फुटला; परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा

डॉग स्क्वॉडमधील सेवेनंतरही कुत्र्यांची जबाबदारी पोलिसांची; निवृत्त श्वानांना मिळणार पोलीस दलातच निवारा

'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक