नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा आतापर्यंतचा सर्वात डिजिटलदृष्ट्या प्रगत आणि पर्यावरणपूरक सोहळा ठरणार आहे. गोदावरी नदीच्या काठावर होणाऱ्या या कुंभमेळ्यात तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यात येणार असून, मर्यादित जागा असूनही भाविकांना सुलभ आणि आध्यात्मिक अनुभव मिळावा यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रयागराज (२०२५) येथील सुमारे ४,००० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत नाशिकमधील जागा कमी असली तरी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन केले जात आहे. कुंभमेळ्यानंतर कार्बन फूटप्रिंटचे मूल्यांकन करण्यात येणार असून ते सकारात्मक राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. झाडे तोडल्याचे व पर्यावरणाची हानी झाल्याचे आरोप त्यांनी फेटाळून लावत, शाश्वतता हेच या आयोजनाचे केंद्रस्थान असल्याचे स्पष्ट केले. गोदावरी नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तसेच इतर पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून आर्थिक हालचालींचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार व गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील. नाशिक रिंगरोडमुळे गुंतवणुकीसाठी मोठी क्षेत्रे उपलब्ध होणार असून ‘कुंभ-उद्योग संगम’ उपक्रमांतर्गत हॅकाथॉन व स्टार्टअप्सच्या सहभागातून उद्योग आणि नवोन्मेषाला चालना दिली जाणार आहे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून श्रद्धा, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि विकास यांचा संगम साधत एक आदर्श निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार शोभा बच्छाव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाच्या तारखा
कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या तारखांमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर, रामकुंड व पंचवटी येथे ध्वजारोहण होणार असून, २९ जुलै २०२७ रोजी नाशिक येथे नगर प्रदक्षिणा काढली जाईल. त्यानंतर २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले अमृत स्नान, ३१ ऑगस्ट २०२७ रोजी दुसरे अमृत स्नान, ११ सप्टेंबर २०२७ रोजी नाशिक येथे आणि १२ सप्टेंबर २०२७ रोजी त्र्यंबकेश्वर येथे तिसरे अमृत स्नान होईल. २४ जुलै २०२८ रोजी ध्वज अवतरण करून कुंभमेळ्याची सांगता केली जाईल.
दोन वर्षांत ५७ हजार कोटींची गुंतवणूक
नाशिकमध्ये उद्योग विस्तारासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून, Mahindra & Mahindra, Reliance Industries आणि Larsen & Toubro यांसारख्या उद्योगसमूहांनी गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षांतच ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिकमध्ये आली असून, दावोस परिषदेतही जिल्ह्यासाठी १२ हजार कोटींची गुंतवणूक निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा विकासातून अर्थव्यवस्थेला चालना
कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा पुढील १० वर्षांत ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रस्ते, ड्राय पोर्ट, रिंगरोड, विमानतळ व रेल्वे सुविधा यामुळे नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योगांना पारदर्शक पद्धतीने सुमारे १४,५०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच इगतपुरी, मनमाड, राजूर बहुला येथे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी सुमारे १,३०० एकर जमीन संपादित केली जाणार असल्याची माहिती दिली. या परिषदेमुळे नाशिकमध्ये उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधा विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.