देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

केंद्राच्या धर्तीवर नागपुरात आपत्ती व्यवस्थापन संस्था; १८७ कोटी ७३ लाख निधीची तरतूद

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नागपूर येथे आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नागपूर येथे आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी १८७ कोटी ७३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या धर्तीवर नागपुरात आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सक्षमपणे प्रतिसाद देण्यासाठी आपत्ती पूर्व तयारी, सौम्यीकरण, आपत्ती प्रवणता, धोका, आपत्तीनंतर मदत व पुनर्वसन, पुनर्बांधणी, तसेच प्रतिसाद, प्रशिक्षण या बाबींचे व्यवस्थापन व नियोजन राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेमार्फत (एसआयडीएममार्फत) होणार आहे.

संस्थेसाठी नागपूर येथील महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (मिहान) येथे दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी १८७ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेसाठी कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक असणारी संवर्गनिहाय नियमित व कंत्राटी, पदे तसेच तांत्रिक सल्लागार इत्यादी मनुष्यबळ घेण्यास व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समिती ही या संस्थेसाठी नियामक समिती म्हणून काम पाहणार आहे.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी