पुणे : आगामी शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिक, कवी, कादंबरीकार आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत महामंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. हे शतकमहोत्सवी मराठी साहित्य संमेलन सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याध्ये येत्या २७, २८, २९ आणि ३० जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे.
मराठी दलित साहित्य विश्वामध्ये डॉ. शरणकुमार लिंबाळे हे अत्यंत नामांकित नाव मानले जाते. सोलापूर जिल्ह्यातील हनूर या गावी १ जून १९५६ रोजी जन्मलेल्या डॉ. लिंबाळे यांनी आपल्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाच्या माध्यमातून देशभरात आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली. त्यांनी ‘सनातन’, ‘उपजन’, ‘दलित ब्राह्मण’ यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांसह ‘दलित चालीसा’ आणि ‘साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला २०२० सालातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याव्यतिरिक्त त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक व संस्थाचालक म्हणूनही प्रदीर्घ सेवा दिली आहे.
संमेलन काटकसरीने, साध्या पद्धतीने
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संमेलनात कोणताही भपका किंवा श्रीमंती थाट न ठेवता अतिशय काटकसरीने व साध्या पद्धतीने हे आयोजन केले जाईल, ज्याचे प्रतिबिंब जेवणातही दिसेल, असे योगेश सोमण यांनी स्पष्ट केले. हे संमेलन शंभरावे असल्यामुळे चार दिवसांच्या कालावधीत साहित्यविषयक तब्बल १०० उपक्रम राबवले जाणार असून तरुणांना व नवोदितांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
संमेलनाच्या तारखांमध्ये बदल
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, आता हे संमेलन २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. यापूर्वी संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, ३१ जानेवारी रोजी पुण्यात पुणे ग्रँड टूर २०२७ या सायकलिंग स्पर्धेचा समारोप होणार असून, त्यामुळे वाहतूक, नियोजन आणि अन्य व्यवस्थांचा विचार करून संमेलनाचा समारोप एक दिवस आधी म्हणजेच ३० जानेवारीला करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझी निवड म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा : लिंबाळे
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले की, ‘गेली ४५ वर्षे मी मराठी भाषेच्या माध्यमातून दलितांच्या हक्क-मुक्तीचा लढा मांडत आहे; त्यामुळे ही निवड म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा, समतेच्या लढ्याची पावती आणि सामाजिक न्यायाचा झालेला सत्कार आहे. बंदुकांच्या जोरावर समाज बदलता येत नाही; समाज, देश आणि माणूस बदलायचा असेल तर त्याच्या मनामध्ये व मेंदूमध्ये साहित्याच्या विचारांनी बदल घडावा लागतो’.
बालपण आणि जडणघडण
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावात १ जून १९५६ रोजी शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म झाला. सामाजिक विषमता, जातिव्यवस्थेची उतरंड, अस्पृश्यता आणि वंचित समूहांच्या जगण्यातील संघर्ष यांचे वास्तव त्यांच्या बालपणापासूनच अनुभवास आले. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत या अनुभवांचा मोठा वाटा राहिला. पुढे याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला आशय, दिशा आणि वैचारिक अधिष्ठान दिले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवी, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 'मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य : एक तुलनात्मक अभ्यास' या विषयावर पीएच.डी. संपादन केली. भारतीय दलित साहित्य आणि अमेरिकेतील कृष्णवर्णीय साहित्य यांच्यातील साम्य, संघर्ष आणि अभिव्यक्तीचे स्वरूप यांचा त्यांनी अभ्यास केला.
नोकरी ते साहित्यिक असा प्रवास
लिंबाळे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून झाली. त्यानंतर १९८६ ते १९९२ या काळात त्यांनी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली. या विद्यापीठातून ते निवृत्त झाले.
'अक्करमाशी'ने घडवला साहित्यविश्वात नवा इतिहास
शरणकुमार लिंबाळे यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवते ते 'अक्करमाशी' हे आत्मकथन. १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी चर्चा घडवली. स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी जातिव्यवस्थेने निर्माण केलेली सामाजिक विषमता, अस्पृश्यता, मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष आणि सामाजिक बहिष्करणाचे वास्तव मांडले. 'अक्करमाशी' हे केवळ एका व्यक्तीचे आत्मकथन राहिले नाही, तर एका मोठ्या सामाजिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करणारे साहित्य ठरले. समाजाच्या प्रस्थापित चौकटीत स्थान न मिळालेल्या माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी या लेखनातून उपस्थित केला. या आत्मकथनाचे इंग्रजी भाषांतर 'द आऊटकास्ट' या नावाने प्रसिद्ध झाले. हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्येही त्याचे भाषांतर झाले. त्यामुळे मराठीतील दलित साहित्याला देशपातळीवर व्यापक वाचकवर्ग मिळाला.
दलित साहित्याला दिले स्वतंत्र सौंदर्यशास्त्र
लिंबाळे यांचे योगदान केवळ आत्मकथनापुरते मर्यादित नाही. दलित साहित्याची वैचारिक मांडणी आणि समीक्षा हा त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' हा त्यांचा ग्रंथ या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो. साहित्याचे मूल्यमापन करताना केवळ पारंपरिक सौंदर्यदृष्टी किंवा प्रस्थापित साहित्यिक निकष पुरेसे नसतात. साहित्यामागील सामाजिक वास्तव, अनुभवांची प्रामाणिकता, मानवी वेदना, संघर्ष आणि परिवर्तनाची जाणीव यांचाही विचार आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.