जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील घरावर सोमवारी रात्री एका अज्ञात ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे जरांगे यांची टेहळणी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंतरवालीच्या गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मनोज जरांगे-पाटील सध्या अंतरवाली सराटी येथे मुक्कामी आहेत. सोमवारी मध्यरात्री त्यांचा मुक्काम असलेल्या घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे आढळून आले. मनोज जरांगे यांनी स्वतः गच्चीवर जाऊन या ड्रोनची पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी अंतरवाली सराटीचे सरपंच व गावकऱ्यांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी अशाच एका ड्रोनने अंतरवालीवर घिरट्या घातल्या होत्या.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाशी संबंधित सगेसोयरे अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैची मुदत दिली आहे. सरकारने या मुदतीत योग्य निर्णय घेतला नाही, तर जरांगे आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे सरकार पुढील काही दिवसांत याप्रकरणी एखादा ठोस निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकणार नाही - जरांगे
आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे, असा मेसेज मराठा समाजात गेलाय. मराठा समाजातील गोरगरीब पोरं मोठे व्हावे यासाठी मी लढतोय. मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. सरकारने माझ्यावर कितीही दबाव आणला तरी ते माझी निष्ठा विकत घेऊ शकणार नाही, असा घणाघात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केला.