महाराष्ट्र

पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! ६ वाहनांना दिली धडक; महिलेचा जागीच मृत्यू

मद्यधुंद टेम्पो चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला.

Swapnil S

पुणे : मद्यधुंद टेम्पो चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला. गीतांजली अमराळे (वय ३५, रा. शास्त्रीनगर) असे या महिलेचे नाव असून, त्यांचे पती श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक आशिष पवार याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रोडवरील करिश्मा चौकाकडून पौड फाट्याकडे टेम्पो भरधाव वेगाने जात होता. त्याने करिश्मा चौकाजवळ एका वाहनाला धडक दिली. त्यावेळी तेथील बाल तरुण मंडळाची आरती सुरू होती. तेथे जमलेल्या लोकांच्या शेजारून टेम्पो भरधाव वेगाने पुढे निघून गेला. पुढे त्याने सिग्नलला रिक्षा, चारचाकी, दोन ते तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यामुळे काही जण जखमी झाले.

त्याचवेळी पौड फाटा चौकात दुचाकीस्वार श्रीकांत अमराळे हे पौड रोडवरून कर्वेरोडला वळत होते. त्यावेळी टेम्पो चालक आशिषने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात श्रीकांत यांची पत्नी गीतांजली अमराळे गंभीर जखमी झाल्या. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील एरंडवणा मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते धावून आले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्रीकांत अमराळे हे शास्त्रीनगरमधील संगम मित्र मंडळाचे पदाधिकारी आहेत. गौरीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ते पत्नीबरोबर जात असताना हा अपघात झाला.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू