खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांची उसळी; स्वयंपाकघरात महागाईचा भडका 
महाराष्ट्र

खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांची उसळी; स्वयंपाकघरात महागाईचा भडका

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता थेट सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली असून खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाजारात सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Swapnil S

सुजीत ताजणे / छत्रपती संभाजीनगर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता थेट सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली असून खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाजारात सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे जहाजवाहतूक, विमा खर्च आणि डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे आयात महाग झाली असून त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानदार आणि ग्राहकांकडून साठा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या खाद्यतेलाची विक्री नेहमीपेक्षा सुमारे १५ टक्क्यांनी वाढली आहे

गृहिणींचे गणित बिघडले

डाळी, भाजीपाला आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे आधीच घरगुती बजेट ताणले गेले असताना आता खाद्यतेल महागल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले आहे. “महागाई आधीच शिगेला पोहोचली आहे. आता फोडणीसाठी लागणारे तेलही महागल्याने महिन्याचा खर्च कसा सांभाळायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी प्रतिक्रिया एका गृहिणीने व्यक्त केली. अंगुरीबाग येथील अक्षय तेल भंडारचे होलसेल व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले की, युद्धस्थिती नसती तर खाद्यतेलाचे दर कमी झाले असते; मात्र आयात अडथळ्यांमुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

५ दिवसांनी मिळतोय माल

घाऊक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी लगेच माल मिळत होता. आता तेलमिलमधून ऑर्डर दिल्यानंतर पाच दिवसांनी मिळत आहे. आयातीतील अडथळ्यांमुळे सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. हॉटेल आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या मका व पाम तेलाची आवकही घटली आहे.

दरवाढीची शक्यता

युद्धस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास खाद्यतेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खर्च आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

खाद्यतेलांच्या दरात झालेली वाढ

२८ फेब्रुवारीच्या तुलनेत १५ मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा दर १६०–१६४ रुपयांवरून १७२–१७६ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलाचा दर १३८–१४० रुपयांवरून १४८–१५० रुपये झाला असून पामतेलाचा दरही १४०–१४२ रुपयांवरून १५०–१५२ रुपयांपर्यंत वाढला आहे.

CBSE च्या ऑनलाईन मूल्यांकन पोर्टलमध्ये त्रुटी; सायबर तज्ज्ञांकडून तपास सुरू

केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेल निर्यात शुल्कात बदल; १ जूनपासून नवे दर लागू

Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत

Mumbai : "पूल सुरक्षितच आहे!" बोरिवली स्थानकातील पादचारी पुलाची पश्चिम रेल्वेकडून पुन्हा तपासणी; व्हायरल व्हिडिओतील दावे फेटाळले

वसई पश्चिम पट्टयातील वाहतूककोंडी कमी होणार; सोपारा-गास-सनसिटी आणि नारंगी-आगाशी बायपास रस्ते