ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंची कडाडून टीका; "ही युती फक्त स्वार्थासाठी आणि... 
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंची कडाडून टीका; "ही युती फक्त स्वार्थासाठी आणि...

ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली असून, ही युती जनतेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी असल्याचा आरोप केला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

ठाकरे बंधूंच्या युतीवरून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.२४) युती जाहीर होताच कडाडून टीका केली आहे. "लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात, मात्र काही युती राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी असतात, तर काही केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी केल्या जातात," असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र डागले.

"महायुतीने गेल्या साडेतीन वर्षांत राज्याला पुढे नेण्यासाठी काम केल्याचा दावा करत शिंदे यांनी सांगितले की, "महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. नगरपरिषदांमध्येही महाविकास आघाडीच्या एकूण नगराध्यक्षांपेक्षा एकट्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या जागा अधिक आल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या काही युत्या या स्वार्थातून आणि सत्तेसाठी झालेल्या असल्याचे स्पष्ट होत आहे," असा टोला शिंदेंनी लगावला.

"मुंबईकडे काही जण सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहत असल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले, “आधी अंडी खात होते, आता कोंबडीच कापायला आले आहेत." दरम्यान, जागावाटप जाहीर न झाल्याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ‘पोरं पळवणारी टोळी’ असा उल्लेख केला होता. या विधानावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. “जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही शिंदे यांनी टीका केली. मराठी माणसाला साद घालणारे उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस आताच आठवतो का, असा सवाल करत शिंदे म्हणाले, "मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, त्याचे खच्चीकरण झाले तेव्हा हे मुद्दे का उपस्थित झाले नाहीत. निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशा घोषणा दिल्या जातात, पण प्रत्यक्षात गिरणी कामगारांसाठी काय केले?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

"आम्ही साडेबारा हजार गिरणी कामगारांना घरे दिली असून, एक लाख गिरणी कामगारांना घरे देण्याचे काम सुरू आहे. क्लस्टर योजनेतून ३५ ते ४० लाख लोकांना टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाईल. विरोधकांकडे मुंबईकरांसाठी कोणती ठोस योजना आहे का?" असा सवाल करत त्यांनी म्हटले की, "मुंबईकर सुज्ञ आहेत आणि या निवडणुकीत त्यांना विकास हवा आहे. फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं, हा विचार करूनच काही लोक एकत्र आले आहेत. ही युती स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी आहे,” अशी घणाघाती टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.

"मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि फक्त मतांसाठी मत बदलणारे..."; ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंसोबत युती का? राज ठाकरेंनी पोस्ट करत सांगितलं नेमकं कारण

"घेरलं होतं मातोश्रीवरील 'विठ्ठलाला' बडव्यांनी.." उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या घोषणेनंतर आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला

मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

'ही' शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत...; संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा एल्गार