मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले़ तसेच सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमधील जागावाटपाची प्रक्रियाही येत्या आठ ते १० दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली़
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. राज्याच्या २८८ जागांसाठी होणारी विधानसभेची निवडणूक २ टप्प्यांमध्ये घेतल्यास सोयीचे ठरेल, असे शिंदे म्हणाले़. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत जागावाटप पूर्ण होईल. उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि गुणवत्ता या आधारावरच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागांचे वाटप होईल, असे त्यांनी स्पष्ट केले़
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापेक्षा उंचावली असल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांमध्ये या योजनेचे श्रेय घेण्यासाठी रस्सीखेचही पाहायला मिळत आहे. जागावाटपात जिंकून येणाऱ्या जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तीनही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत़ आमच्या सरकारने राज्याचा विकास आणि कल्याणकारी योजनांमध्ये समतोल साधला आहे़ आतापर्यंत १ कोटी ६ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत प्रत्येकी १५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळाले आहे. तसेच दीड लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रोजगार मिळवून दिला आहे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करून प्रत्येक मुंबईकराला परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टही महायुती सरकारने ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले़